पनवेल, ता. २७ (बातमीदार) : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांचा अधिकृत जागावाटप फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या निर्णायक टप्प्यात प्रवेश करूनही राजकीय अनिश्चितता कायम असल्याचे चित्र आहे.
महाविकास आघाडीमध्ये बैठकीवर बैठका होत असल्या तरी अनेक प्रभाग आणि जागांवर अजूनही एकमत झालेले नाही. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी मांडलेला जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला चर्चेत आहे. या प्रस्तावावर मित्रपक्ष पूर्णतः समाधानी नसल्याचे स्पष्ट होत आहे. काही पक्षांना अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत असल्याची भावना असल्याने चर्चेत अडथळे निर्माण झाले आहेत. एकमत न झाल्यामुळे मविआतील घटक पक्षांनी स्वतंत्रपणे हालचाली सुरू केल्याचे चित्र आहे. खारघरमध्ये ‘मशाली’ची बैठक, तर कळंबोलीत ‘तुतारी’ची बैठक पार पडली. या बैठकीत प्रभागनिहाय ताकद, इच्छुक उमेदवार आणि संभाव्य लढतींचा आढावा घेण्यात आल्याची चर्चा आहे. ही हालचाल मविआतील अंतर्गत तणावाचे संकेत मानली जात आहे.
दुसरीकडे महायुतीमध्येही अंतिम जागावाटप फॉर्म्युला ठरलेला नाही. कळंबोलीतील प्रभाग क्रमांक आठ येथे धनुष्यबाणाला दोन जागा सोडण्यात आल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे आणि शहरप्रमुख तुकाराम सरक यांच्या पत्नी सायली यांनी भाजपचे संभाव्य उमेदवार बबन मुकादम यांच्यासोबत प्रचार सुरू केला आहे. प्रभाग क्रमांक १८ मधून महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश सोमण यांना महायुतीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जागावाटपाचे गुंतागुंतीचे गणित
कामोठे, खारघर, नवीन पनवेलवर सेनेचा दावा शिवसेनेकडून कामोठे, खारघर आणि नवीन पनवेल या भागांत काही जागा सोडाव्यात, असा प्रस्ताव महायुतीसमोर ठेवण्यात आला आहे; मात्र यावर भाजपकडून अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय आरपीआय आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही महायुतीत समावेशाचा प्रस्ताव आला असून, त्यामुळे जागावाटपाचे गणित अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली
भाजपमध्येच इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे अनेक प्रभागांत उमेदवारी निश्चित करताना विलंब होत आहे. या अंतर्गत स्पर्धेमुळे महायुतीच्या चर्चेलाही पुरेसा वेळ मिळत नसल्याची चर्चा आहे. परिणामी, इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली असून, शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहण्याची चिन्हे आहेत.
पाटील यांनी मांडलेला जागावाटपाचा प्रस्ताव
शेतकरी कामगार पक्ष : ३८ ते ३९
शिवसेना (उद्धव ठाकरे) : २० ते २२
काँग्रेस : १४
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) : ६
मनसे : ३ ते ४
समाजवादी पार्टी : १ ते २