नाट्यप्रयोगादरम्यान मतदार जागरूकता
मिरा-भाईंदर महापालिकेचा अभिनव उपक्रम; नाट्यरसिकांसोबत मतदानाची शपथ
भाईंदर, ता. २७ (बातमीदार) ः मिरा-भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेने एक अभिनव उपक्रम राबवला आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नाट्यप्रयोगाचा आधार घेतला. या उपक्रमाअंतर्गत गुरुवारी (ता.२५) सायंकाळी भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात एका व्यावसायिक नाटकाच्या मध्यंतरात उपस्थित नाट्यरसिकांना मतदानाची शपथ दिली गेली.
महापालिकेच्या स्वीप अभियान अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. आगामी निवडणुकांमध्ये नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, मतदानाचा टक्का वाढावा आणि लोकशाही अधिक बळकट व्हावी, यासाठी महापालिकेच्या प्रशासनाकडून संपूर्ण शहरातील मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. नाट्यप्रयोगाच्या मध्यंतरात महापालिकेची माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत यांनी उपस्थित नाट्यरसिकांना मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक मतदाराने निर्भय व जबाबदारीने मतदान करणे आवश्यक आहे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. यावेळी उपस्थित सर्वांना मतदानाची शपथ घेण्याची संधी दिली गेली, ज्यामुळे नागरिकांमध्ये सक्रिय सहभागासाठी प्रेरणा निर्माण झाली. उपस्थित कर्मचारी आणि अधिकारी यामध्ये अवंतिका भोईर, एलरिटा मळेकर, जयवंत भवर, विरेंद्र हनुमंत जाधव यांचा समावेश होता. नाट्यरसिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि मतदानाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी महापालिकेच्या पुढाकाराचे कौतुक केले. या अभिनव कार्यक्रमामुळे नाट्यरसिकांना केवळ मनोरंजनाचा अनुभव नाही तर लोकशाही प्रक्रियेत सहभागाची जाणीवही निर्माण झाली आहे. महापालिकेच्या यासारख्या उपक्रमांमुळे मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्साह निर्माण होईल आणि शहरातील निवडणूक प्रक्रिया अधिक प्रभावी आणि पारदर्शक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.