धोकादायक निर्माणधीन प्रकल्प हिरव्या जाळ्याने बंदिस्त
‘सकाळ’च्या वृत्तानंतर तत्काळ हालचाल; नागरिकांना दिलासा
बोईसर, ता. २७ (वार्ताहर) : सरावली ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या एका खासगी प्रकल्पाच्या धोकादायक कामकाज व सुरक्षेच्या अभावाकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधताच प्रशासन आणि बांधकामदार सतर्क झाले आहेत. संबंधित बांधकामदाराने संपूर्ण प्रकल्प परिसर हिरव्या सुरक्षा जाळ्याने (ग्रीन नेट) वेढून घेत प्राथमिक सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शिवाय सरावली ग्रामपंचायतीनेदेखील या बांधकामाला नोटीस बजावली आहे.
या प्रकल्पस्थळी यापूर्वी १५ ते २० फूट खोल खड्डे कोणत्याही सुरक्षा संरक्षकाशिवाय उघडे ठेवण्यात आले होते. यामुळे परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगारांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला होता. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात होती. या गंभीर मुद्द्याची दखल घेत ‘सकाळ’ने वास्तव परिस्थिती मांडत प्रशासन आणि बांधकामदारांच्या बेजबाबदारीवर थेट प्रश्न उपस्थित केला होता. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विकसकाने तत्काळ हालचाल करत संपूर्ण बांधकाम क्षेत्र हिरव्या जाळ्याने बंदिस्त केले. तसेच धोकादायक भागांमध्ये इशारा देणारे फलक लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत सरावली ग्रामपंचायतीने संबंधित बांधकामदाराला नोटीस बजावली आहे. बांधकाम नियमांनुसार आवश्यक असलेली सुरक्षा साधने, संरक्षक कुंपण, सूचना फलक तसेच अपघात प्रतिबंधक उपाययोजना तातडीने आणि काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास पुढील कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
......................