दुर्गम भागाचा होणार विकास!
पालघर जिल्ह्यातील उपपाड्यांना जोडणाऱ्या ५४ रस्त्यांना मंजुरी
पालघर, ता. २७ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील पाडे-उपपाड्यांना मुख्य गावांशी जोडणाऱ्या बारमाही रस्त्यांचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. जिल्ह्यात एकूण ७९ संपर्कहीन रस्ते असल्याचे निदर्शनास आले होते. यापैकी २५ रस्त्यांची कामे पूर्ण करून ते आधीच मुख्य रस्त्यांशी जोडण्यात आले असून, उर्वरित ५४ रस्त्यांना विविध शासकीय योजनांअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना वर्षभर दळणवळणाची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या ५४ रस्त्यांपैकी ४५ रस्त्यांची कामे ‘विकसित भारत जी राम जी’ (व्हीबीजीआरजी) योजनेतून प्रस्तावित करण्यात आली आहेत. याशिवाय तीन रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हारमार्फत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून, चार रस्त्यांची कामे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत, तर उर्वरित दोन रस्त्यांची कामे इतर माध्यमांतून करण्यात येणार आहेत. या सर्व रस्त्यांमुळे उपपाड्यांना मुख्य रस्ते व गावांशी जोडले जाणार आहे. तालुकानिहाय पाहता, डहाणू तालुक्यात १३ पैकी ११ रस्त्यांची कामे सुरू असून, विक्रमगडमध्ये नऊ पैकी आठ, मोखाड्यात आठ पैकी सात, जव्हारमध्ये १७ पैकी १५, वाड्यांत तीनपैकी दोन आणि वसईत चारपैकी दोन रस्त्यांची कामे व्हीबीजीआरजी अंतर्गत प्रस्तावित आहेत. एकूण ४५ पैकी २० कामे सध्या सुरू असून, उर्वरित २५ कामांना वन विभाग व खासगी जमिनींसंदर्भातील मंजुऱ्यांसाठी तालुका स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. या रस्त्यांचे खडीकरण ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेतून, तर डांबरीकरण आदिवासी उपयोजना निधीतून करण्यात येणार आहे. काही रस्ते वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातून तसेच वन व खासगी जमिनीवरून जाणार असल्याने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून हे सर्व प्रस्ताव मार्गी लागले आहेत.
..............
शेवटच्या घटकांपर्यंत मदत
यासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी विक्रमगड तालुक्यातील भोपोली-शेतीपाडा रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून गुणवत्तेबाबत सूचना दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले, की दुर्गम व आदिवासी पाड्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे जिल्हा परिषदेचे प्राधान्य आहे. रस्त्यांमुळे आरोग्य, शिक्षण व शासकीय सेवा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचतील. या रस्ते प्रकल्पांमुळे पावसाळ्यात चार महिने संपर्क तुटणाऱ्या भागांमध्येही वर्षभर दळणवळण शक्य होणार असून, पालघर जिल्ह्यातील दुर्गम उपपाड्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास मोठी मदत होणार आहे.