निवडणूक की परीक्षा?
१९ पानी उमेदवारी अर्ज, निबंधलेखन अन् शौचालय वापराचा पुरावा
निवडणूक प्रक्रियेचा वाढता बोजा; अर्ज भरण्यासाठी ‘ठेकेदार’ मैदानात
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ ः स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया यंदा अधिकच गुंतागुंतीची आणि किचकट झाली असून, इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. यंदा उमेदवारी अर्ज तब्बल १९ पानांचा असून, केवळ वैयक्तिक, शैक्षणिक, मालमत्ता माहितीपुरताच मर्यादित न राहता, उमेदवारांकडून थेट निबंधलेखन करून घेतले जात आहे.
‘जर मी निवडून आलो तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात विकासासाठी कोणत्या उपाययोजना करणार’ यावर १०० ते ५०० शब्दांचा निबंध लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निबंधामध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, महिला व युवकांसाठी योजना यासारख्या मुद्द्यांचा समावेश अपेक्षित आहे.
इतक्यावरच ही प्रक्रिया थांबत नाही. अर्जामध्ये उमेदवाराकडे घरात शौचालय आहे का याची सविस्तर माहिती विचारण्यात आली असून, त्यासोबतच शौचालयाचा पुरावादेखील मागण्यात आला आहे. विशेष म्हणजे केवळ फोटोच नव्हे तर शौचालयाचा वापर करीत असल्याबाबत स्वयंप्रमाणपत्र (सेल्फ डिक्लेरशन)सुद्धा उमेदवारांना द्यावे लागत आहे. ‘स्वच्छ भारत’ मोहिमेच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून ही अट घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अर्जामध्ये आधार क्रमांक, पॅन कार्ड, मालमत्ता तपशील, उत्पन्नाचा स्रोत, थकबाकी, गुन्हेगारी पार्श्वभूमी, सामाजिक आरक्षणाशी संबंधित कागदपत्रे, मतदान क्षेत्रातील वास्तव्याचा पुरावा आदी अनेक बाबींची सविस्तर माहिती देणे बंधनकारक आहे. त्यामुळे कार्यकर्ते व प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा फायदा घेत आता अर्ज भरण्याचे ठेकेदार शहरात सक्रिय झाले आहेत. विविध ठिकाणी दुकाने थाटून, उमेदवारी अर्ज मिळवून देणे, अर्ज भरणे, निबंध लिहून देणे, फोटो अपलोड करणे, स्वयंप्रमाणपत्र तयार करून देणे अशा सर्व सेवा ठरावीक शुल्कात पुरविल्या जात आहेत. काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी हजारो रुपयांची आकारणी होत असल्याचीही चर्चा आहे. एकीकडे निवडणूक रणधुमाळीला वेग येत असताना दुसरीकडे उमेदवारी अर्जाची ही अवघड परीक्षा इच्छुकांची खरी कसोटी ठरत असल्याचे चित्र सध्या शहराच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.
अर्ज भरणेच डोकेदुखी
निवडणूक लढवायची इच्छा आहे; पण अर्ज भरणेच डोकेदुखी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया अनेक इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे निवडणूक यंत्रणा अधिक पारदर्शक आणि जबाबदार उमेदवार निवडण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या अर्जात जे प्रतिज्ञापत्र द्यायचे आहेत व जो नियम अर्ज भरताना लागू केला आहे असेच प्रतिज्ञापत्र आणि नियम प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा घालावे, अशी चर्चा उमेदवारांमध्ये रंगली होती.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची चंगळ?
हे अर्ज भरण्यासाठी जसा ठेकेदारांचा फायदा होतोय तसाच काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचादेखील फायदा होत आहे. माजी तसेच अनुभवी उमेदवार लोकप्रतिनिधी हे प्रशासनातील अधिकाऱ्यांचा मैत्रीपूर्ण संबंधाचा वापर करून हा फॉर्म नीट भरला ना याची खात्री करून घेत आहेत. त्यामुळे संबंधित फॉर्म भरून मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची चंगळ होत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.