वाशीमध्ये ‘ठाणे ग्रंथोत्सव २०२५’
तुर्भे, ता. २७ (बातमीदार) : वाशीमध्ये २८ व २९ डिसेंबर या दोन दिवसांत ‘ठाणे ग्रंथोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. वाशी सेक्टर ६ येथील साहित्य मंदिर सभागृहात हा ग्रंथोत्सव साजरा होत असून, विविध सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमांसह भव्य ग्रंथप्रदर्शनाची पर्वणी साहित्यप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.
रविवार, २८ डिसेंबरला सकाळी १० वाजता माजी ग्रंथालय संचालक मो. भु. मेश्राम यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सवाला सुरुवात होणार आहे. या वेळी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर, कोकण विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष कवी अरुण म्हात्रे तसेच ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चांगदेव काळे आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील हे या ग्रंथोत्सवाचे निमंत्रक आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय (ठाणे), ठाणे जिल्हा ग्रंथालय संघ आणि प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाच्या प्रारंभी सकाळी ८ वाजता नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते ‘ग्रंथ दिंडी’ काढण्यात येणार आहे.
उद्घाटनानंतर सकाळी ११ ते १२ या वेळेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ग्रंथालये’ या विषयावर परिसंवाद होणार असून, त्यात पत्रकार सुकृत खांडेकर, गणिततज्ज्ञ डॉ. विवेक पाटकर व निर्मला सामंत प्रभावळकर सहभागी होणार आहेत.