ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचा तिढा सुटला
ठाकरे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांची माहिती
कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : आगामी निवडणुकीसाठी ठाकरे पक्ष आणि मनसेच्या जागा वाटपाचा तिढा सुटला असून दोन्ही पक्षांना सन्मानपूर्वक जागा मिळाल्या असल्याची माहिती ठाकरे पक्षाचे कल्याण पश्चिम आणि मुरबाड विधानसभा जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांनी दिली.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर कल्याण डोंबिवलीत देखील शिवसैनिक आणि मनसैनिक युती करण्याच्या दृष्टीने कामाला लागलो आहोत. पालिकेच्या १२२ जागांपैकी सन्मानपूर्वक जागा मनसेला देण्यात आल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांत दोन्ही पक्षांचे नेते पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा करणार आहेत. या जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचे अल्पेश भोईर यांनी सांगितले.
भाजप-शिंदे गटावर टीका
तर याआधी झालेली नगराध्यक्षपदाची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राने बघितली असून, सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिंदे गटाने एकमेकांचे कपडे फाडण्याचे काम केले. मात्र, आता महापालिका निवडणुकीत दोघेही एकमेकांचे कपडे घालण्याचे काम करत आहेत. हा प्रकार जनता बघत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महापालिकेवर सेना-मनसेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असे अल्पेश भोईर यांनी सांगितले.