सर्वधर्मीयांचे स्नेहसंमेलन
मालवणीत ‘दिवाळी-ईद-ख्रिसमस मिलन’ कार्यक्रम
मालाड, ता. २७ (बातमीदार) : राष्ट्र सेवा दल (मालवणी, काचपाडा, मालाड) आणि सफल संस्था विकास वेल्फेअर सोसायटी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय ‘दिवाळी-ईद-ख्रिसमस मिलन’ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी लहान मुलामुलींनी सर्वधर्मीय संदेशाचे वाचन केले.
हिंदू धर्मीय चिमुकली अदरीजा बाबू डे हिने कलमा आणि श्लोकपठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि रमजान ईदची माहिती दिली. फवाद मुदस्सर सय्यदने दिवाळी सणाचे महत्त्व विशद केले. अंकिता कनोजियाने शीख धर्माबद्दल, तर अंजली बाबू डे हिने ‘ईद-उल-अझा’ (बकरी ईद) का साजरी केली जाते, याबाबत माहिती दिली. इनाया शेख हिने नाताळ आणि ख्रिस्ती समाजातील सणांचे महत्त्व मांडले. हा कार्यक्रम सादर करताना समीर वागळे यांनी सांस्कृतिक व सामाजिक संदेश दिला. ‘प्रथम आपण मानव आणि भारतीय आहोत’ असा संदेश त्यांनी या वेळी दिला. दृष्टीहीन तरुण दानिश शेख याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. सय्यद यांनी केले, तर सोमा डे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. वैशाली सय्यद यांनी पाहुण्यांचे स्वागत व उपस्थितांचे आभार मानले. या वेळी रायन आणि अंकिता कनोजिया यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
घरचा फराळ
कार्यकर्त्यांनी घरातून बनवून आणलेले पदार्थ हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. सिद्धेश्वरी शर्मा (करंजी), रेखा कोटक (नारळ वडी), सोमा डे (गुलगुले) आणि ईशा व वैशाली सय्यद (शीर खुरमा) यांनी आणलेल्या फराळाचा सर्वांनी मिळून आस्वाद घेतला.