उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) : अंबरनाथ-बदलापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये घराणेशाहीच्या राजकारणाला मतदारांनी दिलेल्या ठोस नकारानंतर, शेजारच्या उल्हासनगर महापालिकेच्या रणांगणात सत्ताधारी शिंदे गट अनपेक्षितपणे सावध भूमिका घेताना दिसत आहे. एकेकाळी ‘बालेकिल्ला’ मानल्या जाणाऱ्या पट्ट्यात आलेल्या धक्कादायक निकालांनी आणि वाढत्या अंतर्गत नाराजीतून मिळालेल्या धड्यांनंतर, शिंदे गटाने उघड आक्रमकतेऐवजी पडद्यामागून सत्तासमीकरणे जुळवण्याची नवी, जोखमीपासून दूर राहणारी राजकीय शैली स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
अंबरनाथ-बदलापूरमध्ये एकाच घरातील अनेक उमेदवारांना संधी देत निर्माण झालेले राजकीय समीकरण शेवटी घराणेशाहीचा ठपका ठरले. ‘सत्ता म्हणजे एखाद्या कुटुंबाची मक्तेदारी नव्हे’ असा ठाम संदेश देत मतदारांनी अंबरनाथ-बदलापूरच्या पारंपरिक गडाला हादरा दिला. या निकालांनी केवळ स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले असून, सर्वच राजकीय पक्षांसाठी हा एक इशाराच ठरल्याचे जाणकारांचे मत आहे. शिंदे गटासाठी प्रतिष्ठेचा मानला जाणारा अंबरनाथ-बदलापूर पट्टा गमावल्याने संघटनात्मक पकड ढासळल्याची छाप निर्माण झाली. महायुतीतील स्थानिक मतभेद, भाजपची वाढती ताकद आणि घराणेशाही विरोधी जनमत यांचा एकत्रित परिणाम शिंदे गटाला रणनीतीचा पुनर्विचार करण्यास भाग पाडणारा ठरला आहे.
समन्वयाची वाट
उल्हासनगर महापालिकेत शिंदे गटाने उघड पुढाकार घेण्याऐवजी संयम आणि मोजकी भूमिका स्वीकारली आहे. महापौर पद, उमेदवारी वाटप आणि सत्तावाटपासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर थेट संघर्ष न करता ‘समन्वयातून निर्णय’ या भूमिकेवर भर दिला जात आहे. भाजपसह महायुतीतील घटक नाराज होणार नाहीत, याची विशेष काळजी घेतली जात असल्याचे चित्र आहे.
पडद्यामागची गणिते
एकेकाळी आक्रमक राजकारणासाठी ओळखला जाणारा शिंदे गट आता उल्हासनगरात वेगळी अशी रणनीती अवलंबताना दिसतो. थेट शक्तिप्रदर्शनाऐवजी स्थानिक आघाड्या मजबूत करणे, संभाव्य बंडखोरी टाळणे आणि मतदारांमधील अस्वस्थता शांत ठेवणे, या मुद्द्यांवर भर दिला जात आहे. हीच रणनीती थेट पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या सूचनांनुसार राबवली जात असल्याचीही चर्चा आहे.
निवडणुकीची खरी कसोटी
अंबरनाथ-बदलापूरमधून मिळालेल्या धड्यामुळे उल्हासनगरात घराणेशाहीपासून जाणीवपूर्वक अंतर राखत, विकासाचा अजेंडा आणि व्यापक आघाड्यांवर भर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकांत मतदारांपुढे स्थिर, संयम पण विश्वासार्ह चेहरा मांडत जुना ‘बालेकिल्ला’ पुन्हा उभारता येतो का, याचीच खरी राजकीय कसोटी शिंदे गटासाठी ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.