भिवंडी, ता. २७ (वार्ताहर) : शहरात अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटना सतत सुरू आहेत. दोन दिवसांत चार मुले बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या चार मुलांमध्ये तीन मुली आणि एक मुलगा आहेत. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहिल्या घटनेत, १६ वर्षे तीन महिन्यांची मुलगी ४ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता आईला पाणीपुरी खाऊन येते सांगून घरातून गेली. ती परत न आल्याने शोध घेण्यात आला; परंतु काहीच माहिती मिळाली नाही. तिच्या बेपत्ता होण्याबाबत संशय व्यक्त करत २४ डिसेंबरला शांतीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसऱ्या घटनेत, १६ वर्षीय मुलगी भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी, २३ डिसेंबरला संध्याकाळी कुटुंबाला न कळवता घराबाहेर गेली आणि परत आली नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कोनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तिसऱ्या घटनेत, शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १५ वर्षीय मुलगी २० डिसेंबरला सकाळी ६ वाजता घराबाहेर पडली, ती नैसर्गिक विधीला जाण्यासाठी निघालेली होती. परंतु ती परत आली नसल्याने २४ डिसेंबरला कुटुंबाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान, सर्व घटनांमध्ये पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. शहरात बेपत्ता होणाऱ्या मुलांची वाढती संख्या आणि पोलिसांच्या उदासीनतेमुळे पालकांमध्ये गंभीर चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
१५ वर्षीय मुलगा बेपत्ता
चौथ्या घटनेत, भिवंडी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा १५ वर्षे ९ महिन्यांचा मुलगा २४ डिसेंबरला दुपारी ३.३० वाजता शिकवणीला जाण्यासाठी घराबाहेर निघाला. परत न आल्यामुळे कुटुंबाने त्याची बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली.