२३५ लोकल फेऱ्या आज रद्द
पश्चिम रेल्वेचा ब्लॉक सुरूच; तीन दिवसांत ६२९ फेऱ्यांवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी घेतलेल्या ब्लॉकचा फटका आजही प्रवाशांना बसणार आहे. यामध्ये रेल्वे प्रशासनाने रविवारी (ता. २८) २३५ लोकल फेऱ्या रद्द केल्या असून, शनिवार ते सोमवार या तीन दिवसांत एकूण ६२९ लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय लांब पल्ल्याच्या काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आल्याने सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी १२० अप आणि ११५ डाऊन अशा २३५ लोकल फेऱ्या रद्द राहतील. यामध्ये जलद आणि धीम्या लोकल सेवांचाही समावेश आहे. त्यातच शनिवारी (ता. २७) लोकल फेऱ्या मोठ्या प्रमाणावर रद्द करण्यात आल्याने विरार, बोरिवली, दादर, मुंबई सेंट्रल आणि चर्चगेट स्थानकांत दिवसभर प्रवाशांची गर्दी उसळली. वांद्रे टर्मिनस ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून, कांदिवली ते बोरिवलीदरम्यान पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. यासाठी २० डिसेंबरपासून ३० दिवसांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला असून, तो १८ जानेवारी २०२६ पर्यंत लागू राहील. दरम्यान, शनिवारी रात्री बोरिवली स्थानकात अप व डाऊन जलद मार्गावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग पॅनेल कार्यान्वित करण्यासाठी मोठा नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉकदरम्यान काही मेल व एक्स्प्रेस गाड्या बोरिवली स्थानकावर थांबवण्यात आल्या नाहीत, तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक ८ आणि ९ हे २९ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
वेळापत्रक विस्कळित
पश्चिम रेल्वे मार्गावरील या कामांमुळे काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या असून, काही लोकल गोरेगावपर्यंतच धावत आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत फिरायला जाणारे पर्यटक आणि प्रवासी यांना या ब्लॉकचा मोठा फटका बसत असून, लोकल रद्द आणि विस्कळित वेळापत्रकामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.