विद्यार्थ्यांनी लुटला फणसाड अभयारण्याचा आनंद
रोहा, ता. २७ (बातमीदार) : सामाजिक वनीकरण विभाग, रोहा यांच्यातर्फे फणसाड अभयारण्यात आयोजित वनभ्रमंतीत विद्यार्थीवर्गाने निसर्गाचा भरपूर आनंद घेतला. वांगणी, चिल्हे व कोलाड येथील शाळांमधील सुमारे ४५ विद्यार्थी या एकदिवसीय सहलीमध्ये सहभागी झाले होते.
सहलीत वनभ्रमंती, पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षण व रोपवाटिका अभ्यास दौरा यांचा समावेश होता. ‘चला जाणू या वनाला’ या महाराष्ट्र राज्याच्या निसर्गपर्यटन धोरणानुसार विद्यार्थ्यांना मुख्य गाइड प्रदीप बागवे यांनी जंगलातील निसर्गसंपत्तीचे मार्गदर्शन केले. या वेळी वनक्षेत्रपाल एस. एल. मोरे, वन अधिकारी व्ही. बी. जाधव, वनरक्षक सोमनाथ चव्हाण, सविता कदम, वनमजूर सुनील लांगी, सुरेश वाघमारे, गोपीनाथ वाघमारे, टिळक खाडे, नंदकुमार मरवडे व संतोष शेंडे आदी अधिकारी उपस्थित होते.
सामाजिक वनीकरण विभाग व फणसाड अभयारण्य यांनी विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट व्यवस्थेसह अल्पोपहार व स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली होती. मोबाईलच्या युगात निसर्गापासून दूर होत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत शिक्षणप्रद आणि मनोरंजक ठरला. वनभ्रमंतीच्या माध्यमातून विद्यार्थीवर्गाने निसर्ग व पर्यावरणाबद्दल सखोल जाणिवा मिळवल्या. यामुळे पर्यावरणपूरक वृत्तीला चालना मिळाली.