तीन प्रभागांवर युतीचे घोडे अडले
ठाण्यात तोडगा लवकरच निघण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाव्यात, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यानुसार ठाण्यात महायुतीची तिसरी बैठक झाली. या बैठकीत एकूणच सकारात्मक चर्चा झाली असली तरी तीन प्रभागांवर शिंदे सेना आणि भाजपमध्ये उलटसुलट मतप्रवाह असल्याचे समोर आले आहे. या जागांबाबत लवकरच वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असा विश्वास शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.
शनिवारी (ता. २७) ठाण्यातील वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात महायुतीची तिसरी बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकाही महायुतीच्या माध्यमातूनच लढल्या जातील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तसेच महायुतीची अधिकृत घोषणा लवकरच होऊन उमेदवारांपर्यंत संदेश पोहोचवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
संजय राऊतांवर टीका
महायुतीची पहिली बैठक होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच महापालिकेची निवडणूक भाजपसोबत लढवली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले, की ही बाब आनंद परांजपे यांना माहीत नसल्यामुळेच कदाचित राष्ट्रवादीला महायुतीच्या बैठकीस आमंत्रण देण्यात आले नसावे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका करण्यात आली. ज्यांना उमेदवार शोधण्यासाठी नाशिक आणि पुण्यात वणवण फिरावे लागत आहे, त्यांनी आधी आपला पक्ष सांभाळावा आणि मग महायुतीवर टीका करावी, असा खोचक टोला लगावला.
………………..
आमदार केळकर अनुपस्थित
भाजपचा फॉर्म्युला पक्षश्रेष्ठींना सादर करण्यात आला असून, प्रदेशाध्यक्षांकडे युतीसंदर्भातील सर्व तपशील देण्यात आला आहे. शुक्रवारी यासंदर्भात बैठक झाल्यानंतर भाजप आमदार संजय केळकर यांनी युतीबाबत निर्णयासाठी शिंदे सेनेला शनिवारची अंतिम डेडलाईन दिली होती. मात्र शनिवारी महायुतीच्या झालेल्या तिसऱ्या बैठकीला केळकर अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले होते.
---
निर्णय लवकरच
भाजपाच्या वतीने आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले, की शिवसेना आणि भाजपमध्ये युतीसंदर्भात चर्चा सुरू होती. आता आमच्या दोन्ही पक्षांमध्ये केवळ तीन प्रभागांसंदर्भात चर्चा शिल्लक आहे. याबाबत दोन्ही बाजूने निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे हा विषय सोपविण्यात आला आहे. काही तासांतच याबाबत वरिष्ठ पातळीवर योग्य असा निर्णय घेऊन युती जाहीर होईल.
……….
बैठकीला मीनाक्षी शिंदे
शिवसेना ठाणे महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा देणाऱ्या मीनाक्षी शिंदे याही युतीच्या बैठकीला उपस्थित होत्या. या वेळी मीनाक्षी शिंदे यांना त्यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता, आधी युतीच्या जागावाटपाचा निर्णय होईल; मग माझ्या राजीनाम्याच्या बाबतीतही निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मीनाक्षी शिंदे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.