भिवंडी, ता. २८ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आठ वर्षांनंतर होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्ष आणि भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान या कालावधीत २०१९ व २०२४ अशा दोन विधानसभा निवडणुका पार पडल्या. भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, तर भिवंडी पश्चिममध्ये भाजपचे आमदार महेश चौघुले यांनी आपला गड कायम राखला आहे.
भिवंडी महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत काँग्रेसने राज्यात प्रतिकूल वातावरण असतानाही भिवंडीत उल्लेखनीय यश मिळवले होते. त्या वेळी भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात ४९, तर भिवंडी पश्चिममध्ये ४१ नगरसेवक होते. भिवंडी पूर्वमध्ये काँग्रेसचे २४, भाजपचे ९, शिवसेनेचे आठ, आरपीआय (एकतावादी) चार, समाजवादी पक्षाचे दोन आणि दोन अपक्ष नगरसेवक होते. भिवंडी पश्चिममध्ये काँग्रेसचे २३, भाजपचे १०, शिवसेनेचे चार आणि कोणार्क विकास आघाडीचे चार नगरसेवक होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत धार्मिक मतांचे ध्रुवीकरण झाल्याने पूर्वमध्ये समाजवादी पक्ष, तर पश्चिममध्ये भाजप विजयी झाली. मात्र, महापालिका निवडणुकीत पक्षापेक्षा उमेदवाराचा स्थानिक जनसंपर्क, कामाचा अनुभव आणि मतदारांशी असलेला संवाद अधिक निर्णायक ठरतो. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही आमदारांची कसोटी लागणार आहे. एकूणच, भिवंडी महापालिका निवडणुकीनिमित्त आमदार रईस शेख आणि आमदार महेश चौघुले या दोघांचीही राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मतभेद निवळले
भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक आहे. आमदार रईस शेख आणि सपचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यातील काही वर्षांतील मतभेद पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवळल्याने पक्ष पुन्हा एकत्रित होताना दिसत आहे. काँग्रेसमधील बंडखोर अपात्र नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये दाखल झाले होते. मात्र, त्यापैकी बहुतांश माजी नगरसेवकांनी समाजवादी पक्षाची वाट धरल्याने त्यांची स्थिती मजबूत झाली आहे. यात काँग्रेसची अडचण वाढल्याचे चित्र आहे.
भाजपपुढे आव्हान
दुसरीकडे भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार महेश चौघुले यांच्यावर संपूर्ण पालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ते ताकदीने मैदानात उतरले असले, तरी उमेदवारी वाटपामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस या भागात आपली ताकद पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न करीत असल्याने भाजपपुढे आव्हान उभे ठाकले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.