बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा
१८.५४ कोटींच्या निधीला मंजुरी; ५० गावांतील नागरिकांची आरोग्य हेळसांड थांबणार
निखिल मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. २९ : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीचा प्रश्न अखेर सुटला आहे. या रुग्णालयासाठी १८ कोटी ५४ लाख ४३ हजार ४३० रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, यामुळे अनेक वर्षांपासून आरोग्य सुविधांअभावी त्रस्त असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संजयनगर भागातील आरक्षित जमिनीवर आता या रुग्णालयाची हक्काची इमारत उभी राहणार आहे.
बोईसर हे औद्योगिक केंद्र असल्याने येथे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तारापूर औद्योगिक वसाहत आणि आजूबाजूच्या ५० गावांतील सुमारे दोन लाख नागरिक आरोग्य सुविधांसाठी बोईसरवर अवलंबून आहेत. खासगी रुग्णालयांचे उपचार परवडत नसल्याने गोरगरीब रुग्णांना मुंबई, ठाणे किंवा थेट गुजरातला जावे लागत होते. आता शासकीय रुग्णालय कार्यान्वित होणार असल्याने ही वणवण थांबणार आहे.
२००६ मध्ये मंजूर झालेले हे रुग्णालय शासकीय जागेअभावी नवापूर नाका येथील खासगी इमारतीत भाड्याने सुरू होते. २०२० मध्ये ती इमारत धोकादायक ठरल्याने सध्या हे रुग्णालय ‘टिमा’च्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात चालवले जात आहे. माजी आमदार राजेश पाटील यांनी या रुग्णालयाच्या पाठपुराव्यासाठी आणि जमिनीच्या उपलब्धतेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते, ज्याला आता यश आले आहे.
स्त्री पुरुष कक्ष, लहान मोठे शस्त्रक्रिया गृह, शवविच्छेदन गृह, अधिकारी कर्मचारी कक्ष, शौचालये, प्रतिक्षालय, प्रसाधनगृह, मेडिकल रेकॉर्ड रूम, रुग्ण तपासणी कक्ष, स्टोर रूम, सामुदायिक सभागृह, विविध आजारांवरील पथक कक्ष, आधुनिक रक्तचाचणी प्रयोगशाळा, कार्यालय अशा अनेक सुविधा रुग्णालयाच्या इमारतीत आहेत.
उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सुविधा
वैद्यकीय विभाग : बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग, प्रसूती व स्त्रीरोग विभाग.
शस्त्रक्रिया : लहान व मोठी शस्त्रक्रिया गृहे, आपत्कालीन सेवा.
तपासणी : आधुनिक प्रयोगशाळा, एक्स-रे सुविधा, रक्तचाचणी केंद्र.
इतर : औषध वितरण केंद्र, शवविच्छेदन गृह, मेडिकल रेकॉर्ड रूम आणि कर्मचारी निवासस्थान.
रुग्णालय इमारत : तळमजला + पहिला मजला
तळमजला बांधकाम क्षेत्र : २३२४.३९ चौ. मी
पहिला मजला बांधकाम क्षेत्र : २३३०.१५ चौ. मी
एकूण इमारत क्षेत्रफळ : ४६४४.५४ चौ. मी
रुग्णालय मूळ इमारतीच्या कामाची रक्कम : १६ कोटी ३८ लाख ७२ हजार ८५१ रुपये
रुग्णालय विद्युतीकरणासाठीची रक्कम : २ कोटी १५ लाख ७० हजार ५७९ रुपये
बोईसरकरांना या रुग्णालयाच्या माध्यमातून दर्जेदार आणि मोफत आरोग्य सुविधा मिळणार आहेत. हा सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नांचा विजय असून, याचा मोठा आनंद आहे.
- राजेश पाटील, माजी आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.