पनवेल, ता. ३० (बातमीदार) : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. सहा निवडणूक कार्यालयांमधून आज (ता. ३०) एकूण सुमारे ४०० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून सुमारे १,१३३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली होती; मात्र त्यापैकी सुमारे ४०० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिका निवडणुकीत विशेष बाब म्हणजे, कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्म वितरित केले. त्यामुळे उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण होऊन अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच प्रत्यक्ष निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने समर्थकांसह निवडणूक कार्यालयांकडे कूच केल्याने परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक रस्त्यावर उतरल्याने प्रशासन व पोलिसांवर गर्दी नियंत्रणाचा मोठा ताण आला होता. अर्जाची छाननी उद्या (ता. ३१) होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ जानेवारी आहे. ३ तारखेला अपक्ष उमेदवारांसाठी चिन्हवाटप होऊन प्रत्यक्षात प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.
शेवटच्या दिवशी प्रशासनावर ताण
शेवटच्या दिवशीचा मुहूर्त साधत उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केल्याने सहा निवडणूक कार्यालयांच्या बाहेर समर्थकांची मोठी रांग लागली होती. काही ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्त ठेवावा लागला. गर्दीला आटोक्यात आणताना पोलिसांची चांगलीच कसोटी लागली. निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एका उमेदवारासोबत केवळ सूचक व अनुमोदक यांनाच प्रवेश देण्यात आला होता; मात्र काही ठिकाणी उमेदवारांचे पती-पत्नी व नातेवाईक आत जाण्याचा आग्रह धरत असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
कळंबोलीत चक्काजाम; परिसराला जत्रेचे स्वरूप
पनवेल पालिकेमार्फत कळंबोली वसाहतीमध्ये सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांमुळे आधीच वाहतूक मंदावली होती. त्यातच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीमुळे कळंबोली गावातील निवडणूक कार्यालयाच्या दिशेने मोठी गर्दी झाल्याने कोंडी निर्माण झाली. महायुतीच्या उमेदवारांसोबत हजारो नागरिकांनी निवडणूक कार्यालयाकडे कूच केल्याने संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या शक्तिप्रदर्शनामुळे पनवेल महापालिका निवडणुकीतील राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, पुढील टप्प्यातील छाननी व अंतिम उमेदवार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूचक, अनुमोदक नियमामुळे नातेवाइकांची गोची
निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासोबत केवळ सूचक व अनुमोदक अशा दोन व्यक्तींनाच प्रवेश देण्याच्या नियमामुळे अनेक उमेदवारांच्या नातेवाइकांची मोठी अडचण झाली. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्यक्ष उपस्थित राहून साक्षीदार होण्याची संधी मिळावी, अशी इच्छा असलेल्या कुटुंबीयांना कार्यालयाबाहेरच थांबावे लागले. या नियमामुळे काही ठिकाणी नाराजीचे सूर उमटले, तर काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली; मात्र प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करीत प्रवेशावर निर्बंध कायम ठेवले.
‘मालमत्ता कराचा भरणा फक्त चालू’
पनवेल महापालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये सध्या केवळ मालमत्ता कर भरण्याची खिडकीच सुरू ठेवण्यात आल्याने इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जन्म-मृत्यू नोंद, परवाने, दाखले, तक्रार निवारण आदी कामांसाठी आलेल्या नागरिकांना परत फिरावे लागत असून, प्रशासनाच्या या भूमिकेबाबत सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रभाग समितीनिहाय अर्ज
प्रभाग समिती अर्ज
‘अ’ उपविभाग नावडे ८८
‘अ’ खारघर ५३
‘ब’ कळंबोली ८१
‘क’ कामोठे ६४
‘ड’ पनवेल-१ ५९
‘ड’ पनवेल-२ ५५