ना उत्साह, ना ढोल-ताशांचा दणदणाट
निवडणूक कार्यालयांबाहेर कार्यकर्त्यांची तुरळक गर्दी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बहुतांश उमेदवारांनी मंगळवारी (ता. ३०) शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धाव घेत अर्ज दाखल केले खरे; पण बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, ना उत्साह, ना ढोल-ताशांचा दणदणाट, ना झेंडे असे चित्र होते. कोणत्याही शक्तिप्रदर्शनाशिवाय उमेदवारांनी शांततेत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. कुर्ला नेहरूनगर येथील महापालिका शाळेतील आणि शिवसृष्टी येथील शाळेत असलेल्या निवडणूक कार्यालयात हे चित्र होते.
मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसह दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आयत्या वेळी कोणताही गाजावाजा न करता संबंधितांना एबी फाॅर्म देत अर्ज भरण्यास सांगितले. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी कार्यकर्त्यांची जमवाजमव आणि शक्तिप्रदर्शन न करता आज उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यातच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एका उमेदवारासाठी केवळ दोनच लोकांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे निवडणूक कार्यालय परिसरात ना कार्यकर्ते, ना जल्लोष असेच काहीसे शुकशुकाट असल्याचे वातावरण होते. प्रत्येकजण अधिकाऱ्यांनी दिलेल्या टोकननुसार उपस्थित राहून अर्ज भरत होते.
नाराजांचे मन न दुखावण्याचा प्रयत्न
सध्या एका जागेसाठी अनेक जण इच्छुक असल्याचे चित्र होते; मात्र प्रमुख पक्ष एकत्रित येत निवडणूक लढवत असल्याने अनेकांना डावलून एकालाच एबी फाॅर्म द्यावा लागला. त्यामुळे अधिकृत तिकीट मिळालेल्या उमेदवाराने मोठे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरल्यास ज्यांना उमेदवारी मिळाली नाही; त्या नाराजांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होणार आहे. त्यामुळे आम्ही कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरला असल्याचे एका प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवाराने खासगीत सांगितले.
चोख बंदोबस्त
पालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांना पक्षाचा एबी फाॅर्म मिळालेला नाही. त्यापैकी अनेकांनी अपक्ष अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यामुळे संबंधित उमेदवार आमनेसामने आल्याने अनुचित प्रकार घडू नये, म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच उमेदवारांसोबत केवळ दोनच व्यक्तींना आत घेत इतरांना कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पिटाळून लावले जात होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.