चार दिवसांच्या बालिकेवर कुत्र्याचा हल्ला?
मातेच्या विसंगत उत्तरांमुळे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात
कासा, ता. ३० (बातमीदार) : डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अवघ्या चार दिवसांच्या नवजात बालिकेच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या जखमा कुत्रा अथवा अन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे झाल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मात्र बालिकेच्या जखमांबाबत मातेने दिलेल्या परस्परविरोधी उत्तरांमुळे या प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे.
संबंधित १९ वर्षीय महिला बोईसर परिसरातील एका इमारतीच्या बांधकामावर मजूर म्हणून काम करते. चार दिवसांपूर्वीच तिची प्रसूती झाली. सोमवारी ती आपल्या नवजात बालिकेला उपचारासाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आली होती. वैद्यकीय तपासणीत बालिकेच्या अंगावरील जखमा साधारण एक दिवस जुन्या असल्याचे आढळले. रुग्णालय प्रशासनाने जखमांबाबत चौकशी केली असता, मातेने सुरुवातीला बाळ हातातून पडल्याचे सांगितले. त्यानंतर अंघोळीला नेताना बाळ पडल्याने जखमा झाल्याचे सांगत तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिच्या संशयास्पद वागणुकीमुळे डॉक्टरांनी तातडीने डहाणू पोलिसांना माहिती दिली.
संशय व्यक्त
परिसरातून समोर आलेल्या माहितीनुसार महिलेला बाळ नको असल्याने तिने नवजात बालिकेला उघड्यावर सोडून दिले होते. मात्र स्थानिक नागरिकांनी यावर आक्षेप घेत तिला जाब विचारल्यानंतर तिने बाळाला पुन्हा परत आणले. या काळात उघड्यावर असलेल्या बालिकेवर कुत्रा किंवा मांजरीने हल्ला करून तिला जखमी केले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. बालिकेची प्रकृती अत्यंत गंभीर असून, जखमा खोलवर असल्याने तिला अधिक उपचारांसाठी तातडीने गुजरातमधील वलसाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डहाणू पोलिसांनी या घटनेची प्राथमिक नोंद घेतली असून, घटनेच्या गांभीर्यामुळे बोईसर पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे. नवजात बालिकेवरील जखमा प्राण्याच्या हल्ल्यामुळे झाल्या की अन्य काही कारण आहे, याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत.
अमानवी घटनांची मालिका
पालघर जिल्ह्यात नवजात बालकांना उघड्यावर अथवा उकिरड्यावर टाकून देण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. सुमारे दीड महिन्यापूर्वी पालघर रेल्वेस्थानक परिसरात एका नवजात बाळाला सोडून पालकांनी पलायन केल्याची घटना घडली होती. तर वाणगावजवळील साखरे येथील आश्रमशाळेजवळ उकिरड्यावर एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळला होता. त्यातच आता डहाणू येथे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी अवस्थेत नवजात बालिका रुग्णालयात दाखल झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.