सरळगाव, ता. १२ (बातमीदार) : ३ जानेवारीपासून सुरू असलेल्या प्रसिद्ध म्हसा यात्रेत रविवारी (ता. ११) विक्रमी गर्दी उसळली. एकाच वेळी दोन ते तीन लाख भाविक दाखल झाल्याने परिसरावर प्रचंड ताण आला. गर्दीमुळे पोलिस यंत्रणेवर मोठा ताण पडला असला, तरी यात्रेतील वाढलेल्या उलाढालीमुळे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकत होते.
म्हसा यात्रेनिमित्त परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने अनेक ठिकाणी दोन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी, काही काळ तीव्र वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, अशा आव्हानात्मक परिस्थितीतही पोलिसांनी संयम, सतर्कता आणि नियोजनबद्ध पद्धतीने बंदोबस्त राखत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. संपूर्ण बंदोबस्ताचे नेतृत्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब एडके यांनी केले. त्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे आणि जाधव, पोलिस वरिष्ठ निरीक्षक कामडी आणि अरमाळकर, हवालदार शिंदे; तसेच इतर पोलिस अधिकारी व होमगार्ड अंमलदारांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांनी समन्वयाने काम करत उत्कृष्ट कामगिरी बजावली. रविवार असूनही मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले.
बंदोबस्ताचे मार्गदर्शन
गर्दी प्रचंड वाढल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी डीवायएसपी अनिल लाड हे यात्रास्थळी उपस्थित राहून बंदोबस्ताचे मार्गदर्शन करत होते. या बंदोबस्ताबाबत पोलिस अधीक्षक स्वामी आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक मित्तल यांनीही आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.
गुन्हेगारीला आळा
यात्रेदरम्यान चोरी, मोबाईल स्नॅचिंग यांसारख्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यात पोलिसांना यश आले. गर्दी वाढल्याने लहान मुले हरवण्याचे प्रमाण वाढले असले, तरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही मुले वेळीच पालकांच्या स्वाधीन करण्यात आली. गर्दीत हरवलेली सुमारे १० ते १५ लहान मुले पोलिसांनी तत्काळ शोधली. यामुळे भाविकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे.
आतापर्यंत १५ लाख भाविकांनी घेतले दर्शन
मुरबाड (वार्ताहर) : ऐतिहासिक म्हसोबाच्या यात्रेत रविवारी एकाच दिवशी जवळपास दोन ते सव्वा दोन लाख भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली होती. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे १४ ते १५ लाख भाविकांनी म्हसोबाचे दर्शन घेतले. काही वर्षांच्या तुलनेत यंदा यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संपूर्ण यात्रा परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यंदाच्या यात्रेत वाहतूक कोंडीची समस्या उद्भवलेली नाही.
सरळगाव : म्हसा यात्रेत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.