वज्रेश्वरी, ता. १२ (बातमीदार) : भिवंडी तालुक्याचा ग्रामीण भाग सृष्टीसौंदर्याने नटलेला असून आजही अनेक गावांमध्ये समृद्ध वनसंपदा टिकून आहे. या वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारकडून वन विभागाची यंत्रणा कार्यरत आहे. वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, वनरक्षक व मजूर अशी मोठी फौज भिवंडी तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात या यंत्रणेचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने तालुक्यात अवैध उत्खनन, वृक्षतोड व माती-दगड तस्करी राजरोसपणे सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.
भिवंडी तालुक्यातील जंगलांमध्ये खैर, आवळा, बेहडा, साग, पळस यांसारख्या मौल्यवान वृक्षांची सर्रास तोड होत आहे. तोडलेल्या लाकडांची चोरटी वाहतूकही बेफाम सुरू असून याकडे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कानाडोळा करत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केली आहे. परिणामी, जंगल क्षेत्र झपाट्याने नष्ट होण्याच्या मार्गावर असून जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. भिवंडी शहर व ग्रामीण भागात लाकडांची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी पूर्वी अंजुरफाटा, चाविंद्रा, नदीनाका, खाडीपार, कारवली रोड, नारपोली, कल्याण नाका व ताडाळी येथे वन विभागाचे तपासणी नाके कार्यरत होते. मात्र, कोणतेही ठोस कारण नसताना हे सर्व नाके बंद केल्याने तस्करांना वनखात्याचे अभय मिळाले आहे, असा आरोप मनसेचे विभागाध्यक्ष सुनील देवरे यांनी केला आहे. दरम्यान, वनविभागाकडून तातडीने ठोस कारवाई न झाल्यास अवैध उत्खनन व वृक्षतोडीचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चौकशीचे आश्वासन
या प्रकरणाबाबत ठाणे विभागीय वन अधिकारी सचिन रेंगाल यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत सखोल माहिती घेतली जाईल. संबंधित भिवंडी रेंज वनअधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात येतील. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.