डॉ. रामचंद्र गोडबोले स्वामी विवेकानंद पुरस्काराने सन्मानित
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ ः आदिवासी भागात काम करताना अनेकदा निराशा येते. अशा वेळी मिळणारा हा पुरस्कार प्रेरणादायी ठरतो. आपल्या कार्याची दखल घेतली जाते, ही भावना नवे बळ देते, अशी भावना छत्तीसगड राज्यातील बस्तर भागात आदिवासी, वंचित व उपेक्षित समाजासाठी अविरत वैद्यकीय सेवा देणारे आयुर्वेदाचार्य डॉ. रामचंद्र त्रिंबक गोडबोले यांनी बोलून दाखवली. यंदाचा स्वामी विवेकानंद पुरस्कार डॉ. गोडबोले यांना प्रदान करण्यात आला असून पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी आपले विचार मांडले.
स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे यंदाचा स्वामी विवेकानंद पुरस्कार सोहळा दत्तनगर शाळेत पार पडला. बस्तर भागात आदिवासी, वंचित व उपेक्षित समाजासाठी सेवा देणाऱ्या डॉ. गोडबोले यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. रामचंद्र गोडबोले, डॉ. संजय कुलकर्णी, उपाध्यक्षा डॉ. सरोज कुलकर्णी, कार्यवाह शिरीष फडके, सहकार्यवाह प्रमोद उंटवाले आणि कोषाध्यक्ष संजय दीक्षित उपस्थित होते.
डॉ. गोडबोले म्हणाले, बस्तर भागात कुपोषण, मलेरिया, सिकलसेल ॲनिमिया यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात असून अंधश्रद्धा व अज्ञानामुळे त्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. शासन व वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रयत्नांमुळे परिस्थितीत सुधारणा होत असली तरी अजून मोठ्या प्रमाणात काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रथमोपचार विषयक जनजागृती व मनुष्यबळाची गरज असल्यावर त्यांनी भर दिला.
बस्तरची निवड कार्यक्षेत्र म्हणून करण्यामागचे कारण सांगताना त्यांनी जंगल प्रेम, आईकडून मिळालेली सेवाभावी शिकवण आणि नोबेल पुरस्कार विजेते अल्बर्ट श्वेत्झर यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा यांचा उल्लेख केला. डॉ. बाबा आमटे व डॉ. प्रकाश आमटे यांच्या भेटीनंतर ग्लॅमरपासून दूर राहून सातत्याने काम करण्याचा संदेश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांत बस्तरमध्ये कार्यास सुरुवात करण्यामागे पत्नी सुनीता गोडबोले यांचा दृढनिश्चय असल्याचेही त्यांनी सांगितले. नक्षलवादी भाग असूनही स्थानिक आदिवासींना आपल्याला स्वीकारण्याचे कारण आरोग्यसेवेच्या माध्यमातून निर्माण झालेला विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाषेच्या अडचणी वनवासी कल्याण आश्रमातील कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे दूर झाल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सुनीता गोडबोले म्हणाल्या की, अशा कार्यक्रमांमुळे बस्तरसारख्या आदिवासी भागाबद्दल समाजात जागरूकता निर्माण होते. महाराष्ट्राची सामाजिक सेवाभावी परंपरा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने वेळ देणे आवश्यक आहे.
गणित प्रदर्शनचे कौतुक
सत्कारमूर्ती डॉ. गोडबोले यांनी संस्थेच्या रामानुजन गणित उद्यान या गणित प्रदर्शनालाही भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले. स्वामी विवेकानंद शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.