उल्हासनगर, ता. १४ (वार्ताहर) : प्रचाराच्या रणधुमाळीला मंगळवारी संध्याकाळी पूर्णविराम मिळाला असला, तरी उल्हासनगरच्या राजकारणात खरी कसोटी आता सुरू झाली आहे. उमेदवारांसाठी मंगळवारची रात्र आणि मतदानाच्या आदल्या दिवसाची बुधवारची रात्र हीच ‘रात्र वैऱ्याची’ ठरली आहे. याच निर्णायक टप्प्यावर सर्वच उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना ‘जागते रहो’चा स्पष्ट आदेश देत सावधगिरी आणि सज्जतेचा संदेश दिला आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अधिकृत कालावधी मंगळवारी संध्याकाळी संपुष्टात आला. झेंडे उतरले, भोंगे शांत झाले आणि प्रचार सभांचा धडाका थांबला. मात्र प्रचार थांबला म्हणजे राजकीय हालचाली थांबल्या असे नव्हे. उलट, मंगळवारची रात्र आणि मतदानाच्या आधीची बुधवारची रात्र हीच निवडणुकीतील सर्वात संवेदनशील आणि निर्णायक वेळ होती. या काळात मतदारांवर प्रभाव टाकण्याचे गुप्त प्रयत्न, अफवा पसरवणे, समाज माध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे डाव आखले जाऊ शकतात, अशी भीती सर्वच राजकीय पक्षांना होती. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. एकही क्षण निष्काळजीपणा नको, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज असताना, दुसरीकडे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही आपापल्या पातळीवर पहारा देत आहेत. आता सर्वांचे लक्ष थेट गुरुवारच्या सकाळकडे लागले आहे. मतदार शांततेत आणि निर्भयपणे मतदान करतील, यासाठी ही ‘जागते रहो’ची रात्र किती निर्णायक ठरते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
स्वतंत्र संपर्क व्यवस्था
मतदानाच्या आदल्या रात्री कोणतीही अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच मतदारांमध्ये भीती अथवा संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांना आपल्या-आपल्या प्रभागात लक्ष ठेवण्यास सांगितले होते. काही ठिकाणी तर समाज माध्यमांवर नजर ठेवण्यात आली होती. अफवा खंडन पथके आणि तातडीने माहिती देण्यासाठी स्वतंत्र संपर्क व्यवस्था उभारण्यात आली आहे.