ग्रामीण क्रिकेट लीग आता निवडणुकीनंतरच
जिल्हा परिषद, पंचायत समितीमुळे आचारसंहिता लागू; आयोजकांचा निर्णय
पोयनाड, ता. १४ (बातमीदार) : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचा फटका ग्रामीण भागातील क्रीडा उपक्रमांनाही बसला असून, पोयनाड, खारेपाटा परिसरातील ग्रामीण क्रिकेट लीग पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी मकर संक्रांतीनंतर सुरू होणाऱ्या या लोकप्रिय लीग आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच होणार आहेत.
पोयनाड, शहाबाज, शहापूर, कुर्डूस आदी ग्रामीण भागातील युवकांना क्रिकेटसारख्या खेळाकडे आकर्षित करणे, तसेच ग्रामीण भागातून गुणवत्तापूर्ण खेळाडू घडवणे या उद्देशाने दरवर्षी गावोगावी ग्रामीण क्रिकेट लीग किंवा प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमुळे युवकांना हक्काचे मैदान मिळते, खेळाची शिस्त लागते आणि स्पर्धात्मक वातावरणात आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. अनेक उत्तम फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक याच लीगमधून पुढे आलेले आहेत. या स्पर्धांमध्ये खेळाडूंना वैयक्तिक कामगिरीनुसार बक्षिसे, मानचिन्हे व चषक देऊन त्यांचे कौतुक केले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे सध्या कोणतेही सार्वजनिक आयोजन, जाहिरात किंवा कार्यक्रम घेण्यास निर्बंध असल्याने आयोजकांनी कायद्याचे पालन करत लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटप्रेमी युवकांमध्ये या निर्णयामुळे थोडी निराशा असली, तरी निवडणुकीनंतर अधिक नियोजनबद्ध आणि मोठ्या स्वरूपात स्पर्धा घेण्याचा आयोजकांचा मानस आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनंतर ग्रामीण क्रीडा वातावरण पुन्हा जोमात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
...............
चौकट : नियोजन फेब्रुवारीच्या शेवटी
पोयनाड परिसरातील विविध गावांमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन होते. यंदा आचारसंहिता लागू झाल्याने या स्पर्धा १० फेब्रुवारीनंतर पुढे ढकलण्यात आल्या असून, फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात, होळीच्या सुमारास त्या घेण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.