महापालिका निवडणुकीमुळे मकर संक्रांतीचा पारंपरिक उत्साह मावळला; बाजारातील गर्दीही कमी
कल्याण, ता. १४ (बातमीदार) : महानगरपालिका निवडणुकांचा यंदाच्या मकर संक्रांतीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. राजकीय नेते, उमेदवार आणि प्रशासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्याने सणाचा उत्साह यंदा कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तिळगुळ घ्या, गोड बोला म्हणण्याऐवजी सर्वत्र मतदानाची आणि प्रचाराचीच चर्चा रंगली होती.
वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी सामजिक आणि राजकिय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांसाठी संक्रातीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. परंतु, पालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्याने यंदाचा मकर संक्रातीचा उत्साह काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील अनेक ठिकाणी फक्त पारिवारिक स्तरावर मकर संक्रात साजरी करण्यात आली. बाजारपेठांमध्येही यंदा खरेदीचा उत्साह नसल्याचे काहीसे चित्र होते. तर, कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, पश्चिमेतील मुख्य बाजारपेठ आणि डोंबिवलीतील स्थानक परिसर आणि व्यापारी रस्त्यांवर नेहमीप्रमाणे तिळगुळ, लाडू व इतर साहित्य घरी घेऊन येणाऱ्या ग्राहकांची गर्दी कमी होती.
बाजारपेठेत यंदा गर्दी कमी दिसून आली. दुसरीकडे ऑनलाइन खरेदी होत असल्याने विक्री कमी झाली आहे. निवडणुकीच्या धामधुमीत सणाचे महत्त्व काहीसे कमी झाले असून मागील वर्षी आम्ही ५० ते ६० किलो लाडू विकले होते, तिथे यंदा फक्त २० ते २२ किलोच लाडू विकले होते.
- गणेश पंडित, व्यावसायिक, कल्याण