दिव्यांग, रुग्णांसह ज्येष्ठ नागरिकांचा तरुणांना लाजवणारा उत्साह
जुईनगर, ता. १५ (बातमीदार) : गुरुवारी (ता. १५) पार पडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिव्यांग, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांनी दाखवलेल्या मतदान उत्साहाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शारीरिक अडचणी, आजारपण आणि वयाच्या मर्यादा असूनही “मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे” या ठाम भावनेतून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर उपस्थिती नोंदवली.
सकाळपासूनच वाशी, सानपाडा आणि जुईनगर परिसरातील विविध मतदान केंद्रांवर व्हीलचेअरचा आधार घेत, काठीच्या सहाय्याने तसेच नातेवाइकांच्या मदतीने आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे दृश्य पाहायला मिळाले. काही ज्येष्ठ नागरिकांनी दीर्घ रांगेत शांतपणे उभे राहून आपला क्रमांक येण्याची वाट पाहिली, तर अनेक दिव्यांग मतदारांनी मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घेत सहज आणि निर्धास्तपणे मतदान केले. मतदान यंत्रांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या सोयी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि स्वयंसेवकांची मदत याबाबत अनेक दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांनी समाधान व्यक्त केले. निवडणूक आयोगाने केलेल्या व्यवस्थेबद्दल आभार मानतानाच, काही दिव्यांग मतदारांनी मतदान केंद्रांवर बसून फोटो काढता येईल असा स्वतंत्र ‘सेल्फी पॉइंट’ नसल्याची खंतही व्यक्त केली. विशेष म्हणजे, अनेक तरुण मतदार अद्याप मतदानाबाबत उदासीन असतानाच दिव्यांग, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांनी दाखवलेला उत्साह हा तरुणांना लाजवणारा ठरत आहे. मतदान केंद्रांवरील कर्मचारी, होमगार्ड आणि पक्ष कार्यकर्त्यांनीही या मतदारांच्या इच्छाशक्तीचे कौतुक करत त्यांना मतदान यंत्रांपर्यंत ने-आण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असते, हे या निवडणुकीत दिव्यांग, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केले. त्यांच्या या प्रेरणादायी सहभागामुळे नवी मुंबईतील निवडणूक प्रक्रियेला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.