पनवेल, ता. १५ (बातमीदार) : महापालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा गंभीर प्रकार समोर आला आहे. कळंबोली येथील बालाजी इंटरनॅशनल स्कूल तसेच कामोठा परिसरातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटावर लावण्यात येणारी शाई साध्या पाण्याने व टिश्यू पेपरनेही सहज निघत असल्याचे निदर्शनास आले आहे. पूर्वी किमान तीन दिवस शाई न निघण्याची खात्री असायची; मात्र या वेळी मतदान केंद्राबाहेर पडताच शाई निघून जात असल्याचे प्रकार समोर आल्याने दुबार मतदानाची शक्यता नाकारता येत नसल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
कामोठे येथील इंडो-स्कॉट शाळा, मतदान केंद्र क्रमांक १३ येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बाहेर आल्यावर सामाजिक कार्यकर्ते सुनील शिरीषकर यांनी स्वतः प्रयोग करून पाहिला. साध्या पाण्याने व टिश्यू पेपरने बोट पुसल्यानंतर शाई निघून गेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकाराचा व्हिडिओ तयार करून संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. या बाबीची माहिती निवडणूक अधिकारी आणि महापालिका आयुक्त तसेच उपआयुक्त (निवडणूक) यांना देण्यात आली. निवडणूक साहित्य हे आयोगाकडूनच पुरविण्यात आले आहे, असे उत्तर देण्यात आले; मात्र या उत्तराने मतदारांचे समाधान झाले नाही. शाईच्या गुणवत्तेबाबत आणि तिच्या टिकाऊपणाबाबत ठोस कार्यवाहीची गरज व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग व संबंधित यंत्रणेने तातडीने या प्रकाराची दखल घ्यावी. वापरण्यात आलेल्या शाहीची गुणवत्ता तपासावी आणि भविष्यात दुबार मतदानाची कोणतीही शक्यता राहू नये, यासाठी योग्य ती कठोर कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी नागरिक, सजग मतदारांकडून होत आहे.