दलित वस्त्यांत भरघोस प्रतिसाद
सकाळपासून मतदानाला गर्दी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : दलित वस्त्यांमध्ये आज सकाळपासूनच मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दलित समाजाचे प्राबल्य असलेल्या भागात सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी झाली होती. मतदार मोठ्या प्रमाणात उतरले होते. मतदार याद्यांतील गोंधळाने मतदारांना त्रास सहन करावा लागला.
चेंबूर, गोवंडी, कुर्ला, धारावी, कांदिवली, मालाड, विक्रोळी, घाटकोपर, वडाळा, वरळी, शिवडी, भायखळा या ठिकाणच्या दलित वस्त्यांमध्ये सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. दलित मतदारांचा टक्का हा निर्णायक ठरणारा असल्यामुळे या मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. दलित समाजाची मते निर्णायक ठरणार असली तरी या समाजाची मते या वेळी वेगवेगळ्या मतदारांत विभागली जाण्याची शक्यता आहे.
दलित टक्का विभागला
दलित मतदार काॅँग्रेस, राष्ट्रवादी काॅँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅँग्रेस यांच्यात विभागली जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने नुकतीच युती केली आहे. काॅँग्रेस आणि वंचित आघाडी हे आघाडी करून लढले. प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युतीत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे भाजपसोबत महायुतीत आहेत. या सर्वच पक्षांत दलित मतदारांच्या मतांचा टक्का विभागला जाण्याची शक्यता आहे.
----------
दलित वस्त्यांमध्ये उत्साह आहे. एससी प्रवर्गातील विविध पक्षांचे अनेक उमेदवार असल्याने मतदार संभ्रमात आहेत. त्यात मतदार याद्यांतील गोंधळामुळे मतदारांना अडचणी निर्माण झाल्या.
- आनंद शिंदेकर, घाटकोपर
-----------
मतदार यादी सदोष आहे. एका मतदारसंघातील मतदारांना अन्य मतदारसंघात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे यादीतील घोळामुळे मतदारांना त्रास झाला. मत कोणाला द्यायचे, याबद्दल दलित मतदारांत प्रश्नच होता.
- वसंत गायकवाड, रमाबाई काॅलनी, घाटकोपर