मुंबईत मतदार यादीत घोळ;
अधिकारी-कर्मचारी हतबल
अनेकांची नावे गायब; बूथ, मतदान केंद्र, छायाचित्रे, लिंग बदलले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मतदार यादीतून नाव गायब, ऐनवेळी बदललेले बूथ आणि मतदान केंद्र, अनेकांचे फोटो, नाव व लिंगही बदलले, मतदार यादीत झालेल्या या घोळामुळे मुंबई पालिका निवडणुकीच्या मतदानाचा दिवस गाजला. अनेक आस्थापनांनी पूर्ण दिवस सुट्टी न दिल्यामुळे अनेक मतदारांनी सकाळीच मतदान उरकून कामावर जाण्याचे नियोजन केले होते; मात्र मतदार यादीतील घोळामुळे त्यांना पायपीट व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आज पालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्र तेच असेल या भरवशावर मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांची मोठी निराशा झाली. याआधी आपण याच मतदान केंद्रावर मतदान केले होते, असे मतदार सांगत होते, तर मतदान केंद्रावरील यादीत त्यांचे नाव सापडत नसल्याने कर्मचारीही चांगलेच हवालदिल झाले होते. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतरही तुमचे नाव असेल तर मतदान करा, अन्यथा काही करू शकत नाही. दुसऱ्या मतदान केंद्रावर चौकशी करा, अशी हतबल प्रतिक्रिया त्यांच्याकडून दिली जात आहे. नावात किरकोळ चूक असल्यानेही काही मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले, त्यामुळे मतदारांचा संतापाचा कडेलोट पाहायला मिळाला.
मतदानाचा हक्क नाकारला
ओळखपत्र, स्लिपमधील फोटो आणि लिंग बदलल्याने ४८ वर्षीय डिसोझा बोनिटा मॅन्युवेल यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. प्रभाग क्रमांक ९४मध्ये राहणाऱ्या डिसोझा बोनिटा या सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मतदानासाठी पोहोचल्या; पण त्यांच्या मतदान पावतीवर त्यांच्या पतीचा फोटो होता. शिवाय, लिंगही बदललेले होते. त्यामुळे बोनिटा यांना मतदानाचा हक्क नाकारला. २०१७मध्ये बोनिटा यांनी निवडणूक आयोगाकडे याची रीतसर तक्रार केली होती. फोटोत बदल करण्यासाठी पाठपुरावा केला होता; मात्र हा गोंधळ कायम राहिल्याने त्यांचा मतदानाचा हक्क नाकारला गेल्याचे त्यांचे शेजारी अनुज कदम यांनी सांगितले. दरम्यान, ९४ प्रभागांतील मतदार हेमंत खेडेकर हे बूथ शोधण्यासाठी तीन ठिकाणी फिरले. त्यात त्यांचा एक तास गेल्याची तक्रार त्यांनी केली.
नवमतदारांना त्रास
विक्रोळी येथील प्रगती विद्यालय आणि विकास हायस्कूल येथील मतदारसंघात मतदारांची नावे नसल्याने गोंधळ उडाला. उमेदवारांकडे असलेल्या यादीमध्ये नाव असताना मतदान केंद्रावरील यादीत नाव का आले नाही, असा सवाल उपस्थित केला जात होता.
-------
उमेदवाराचेच नाव सापडेना!
दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांच्या कन्या ॲड. गाथा प्रभाग ११८मधून भारतीय मानवतावादी पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुरुवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या मतदान केंद्रावर गेल्या; मात्र मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना दोन तास त्यांचे नावच सापडले नाही. उमेदवार म्हणून प्रभागातील कोणत्या यादीत नामोल्लेख आहे, याची माहिती आयोगाला द्यावी लागणे बंधनकारक असते. दोन तासांनंतर गाथा यांचे नाव सापडले आणि त्यांना मतदान करता आले. माझ्यासमोर यादीत नाव नाही. अनेक नवमतदार आणि ज्येष्ठ नागरिकांना केंद्राबाहेर हाकलून लावण्यात आल्याचा आरोप ॲड. गाथा यांनी केला.
----
आता मी मतदान करणार नाही...
मतदानासाठी सकाळीच घराबाहेर पडलेल्या सुभाष सोनार यांना मतदान केंद्र शोधताना दुपार झाली. एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात त्यांना पाठवण्यात येत होते. अखेर वैतागून आता मी मतदान करणारच नाही, असे म्हणत थेट घरचा रस्ता धरला. भांडुपच्या प्रभाग क्रमांक ११३ मध्येही हाच प्रकार घडला.
--------
मतदार यादीत माझे नावच नसल्याने मतदान करता आले नाही. याउलट माझ्या वडिलांचे निधन झालेले असतानाही त्यांचे नाव मतदार यादीत आहे.
- मनोहर सावंत, खेरवाडी
सकाळीच मतदान केंद्रावर आले होते; मात्र माझे नाव कोणत्याच यादीत नाही. त्यामुळे मतदान न करताच मला परतावे लागत आहे.
- रश्मी गावडे, वांद्रे
मतदानासाठी आलेले मतदार नाव नसल्याने नाराज झाले होते. त्यामुळे मतदार यादीचे ॲप आणि याद्या चाळून आम्ही त्यांची नावे शोधून देत आहोत; पण निवडणूक अधिकारी कोणतेच सहकार्य करत नसल्याने अनेकजण मतदान न करताच परतत आहेत.
- स्नेहा साटम, उपविभागप्रमुख, शिवसेना (ठाकरे)
मी माझ्या कुटुंबासह विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते; मात्र आज माझे एकट्याचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर गेले असेल, असे सांगितले जात आहे. मग मी मतदान कसे करायचे, कुठे शोधायचे, हा प्रश्न आहे.
- जीवन करूळकर, मतदार (कुर्ला)
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.