गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांची चौकशी करून गुन्हे दाखल करा
पेण, ता. १५ (वार्ताहर) : पेण तालुक्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय व्यक्तींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली डीवायएसपी जालिंदर नालकुल यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.
पेण तालुक्याच्या वडखळ पोलिस ठाणे हद्दीत उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या अनिलकुमार फुल्लन रामता (वय २८) याने आधार कार्ड हरवल्याचे कारण सांगत वडखळ पोलिस ठाण्यात गोंधळ घातला होता. संबंधित व्यक्तीने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांत रायगड जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचे परप्रांतीय मोठ्या प्रमाणावर दाखल झाले असून, काहींनी अनधिकृत व्यवसाय सुरू केले आहेत. पोलिस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असताना, अशा व्यक्तींकडून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी कृत्ये घडणे हे गंभीर बाब असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.