शांततापूर्ण ‘सावळागोंधळ’
जिल्ह्यातील सहा महापालिकांचे मतदान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांची धामधूम अखेर आज ईव्हीएम यंत्रामध्ये मतदान बंदिस्त झाल्यावर थांबली. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोेंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या सहा महापालिकांसाठी आज गुरुवारी (ता. १५ जानेवारी) मतदान पार पडले. बहुतेक ठिकाणी सावळागोंधळ उडालेला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या दोन तासांमध्ये मतदारांकडून मिळालेला अत्यल्प प्रतिसाद, त्यात मशीन बंद पडणे, मतदार यादीतून नावे गायब होणे अशा प्रकारांमुळे नंतरच्या सत्रामध्ये मतदारांत निरुत्साह पसरला. अखेर उमेदवारांनाच मतदारांना घराबाहेर काढावे लागल्याचे दिसले.
ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी आज मतदान झाले. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले होते. जागावाटप, एबी फॉर्मचा गोंधळ, अर्ज बाद प्रक्रिया, त्यानंतर माघारीच्या दिवशी घडलेले बिनविरोध नाट्य, बंडखोरी अशा राजकीय गरमागरमीत प्रचाराचा धुरळा उडाला होता. दुसरीकडे ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पालिका प्रशासन आणि पोलिस यंत्रणाही कामाला लागली होती. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, मतदार जनजागृती, मतदान केंद्रांची उभारणी, ईव्हीएम मशीनची सज्जता अशा अनेक आघाड्यांवर प्रशासन काम करीत होते. पण आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सर्वच स्तरांवर मतदारांचा हिरमोड झाल्याचे दिसले.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई, मिरा-भाईंदर या सर्वच महापालिकांच्या निवडणुकीत सकाळपासूनच सावळागोंधळ उडाल्याचे दिसून आले. मतदार यादीतून नावे गायब होण्यापासून ते बोगस मतदान झाल्याचे आरोप या वेळी झाले. काही अपक्षांच्या नावापुढील बटण दाबले जात नसल्याच्या तक्रारी होत्या. ईव्हीएम मशीन बंद पडत असल्याचेही दिसले. त्यामुळे काही काळ मतदारांना रांगेत ताटकळत राहावे लागले. दरम्यान, मतदानाआधीच्या रात्री अनेक ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम पार पडल्याची चर्चा जोरात होती. अनेक ठिकाणी पैसे वाटप करणाऱ्यांना नागरिकांनी चोप दिल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर फिरत होती. मतदानाच्या दिवशी शाब्दिक चकमकी झाल्या तरी कुठेच हाणामारी झाली नसल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
प्रमुख लढत
ठाणे - शिवसेना-भाजप युती विरुद्ध शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटाची महाविकास आघाडी
नवी मुंबई - भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट
उल्हासनगर - भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट, टीओके, साई पक्ष युती
भिवंडी - शिवसेना शिंदे गट, भाजप युती विरुद्ध सपा, काँग्रेस, महाविकास आघाडी
कल्याण-डोंबिवली - शिवसेना-भाजप युती विरुद्ध शिवसेना ठाकरे गट, मनसे आघाडी
मिरा-भाईंदर - भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट