महापालिका निवडणुकीत मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा; तरुणांसह ज्येष्ठांचा मोठा सहभाग
मुंबई, ता. १५ : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज झालेल्या मतदानात उत्स्फूर्त सहभाग घेत मतदान हक्क बजावला. मुंबईतील २२९ प्रभागांसाठी १० हजार २३१ मतदान केंद्रे होती. सकाळी मतदान सुरू होताच शहर व उपनगरांतील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. विशेषतः तरुण, नवमतदार आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मतदानाबाबत मोठा उत्साह दिसून आला.
सकाळपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत शहरातील काही वस्त्यांचा अपवाद वगळता उपनगरांत ठिकठिकाणी महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. काही ठिकाणी मतदान केंद्रांवर महिलांसाठी स्वतंत्र रांगा, स्वयंसेवकांची मदत आणि पोलिस बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. या मतदानासाठी ठिकठिकाणी मुंबई विद्यापीठातील एनएसएस आणि एनसीसीचे तब्बल तीन हजार ५०० हून अधिक विद्यार्थी मतदारांच्या रांगा लावणे, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवणे अशी मदत करीत होते. मतदारांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करीत होते.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांनीही उत्साहाने मतदान केले. काही मतदान केंद्रांवर सोयीसुविधांचा अभाव जाणवला असला, तरी मतदारांनी संयम राखत आपला मतदानाचा हक्क बजावला. यामुळे मुंबईकरांनी दाखवलेल्या या सहभागामुळे शहराच्या विकासासाठी सक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्व निवडले जाईल, अशा अपेक्षा मतदारांकडून व्यक्त करण्यात आल्या.