नवी मुंबईत अजाहन जयासारो यांच्या धम्मदेसनेचा भावपूर्ण सोहळा
नवी मुंबई, ता. १५ : जागतिक कीर्तीचे बौद्ध धर्मगुरू अजाहन जयासारो सध्या भारत भ्रमणावर असून, त्यांच्या धम्मदेसनेच्या कार्यक्रमांना देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्या धम्मविचारांचा जागर सुरू असतानाच ११ जानेवारीला बुद्ध प्रतिष्ठान, वाशी येथे त्यांच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल तसेच आसपासच्या परिसरातून मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित राहिल्या होत्या. सकाळपासूनच बुद्ध प्रतिष्ठान परिसरात शांत, शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळत होते. भंते अजाहन जयासारो यांनी आपल्या धम्मदेसनेत मानवी जीवनातील ताणतणाव, दुःखाची कारणे, मनाचे नियंत्रण, करुणा, संयम आणि प्रज्ञेचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. उपस्थित उपासक-उपासिकांनी विचारलेल्या प्रश्नांना भंतेजींनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी शब्दांत उत्तर देत जीवनातील गुंतागुंतीच्या समस्यांवर बौद्ध धम्माच्या माध्यमातून उपाय सांगितले. स्वतःच्या आयुष्यातील अनुभव, प्रसंग आणि त्यातून मिळालेला बोध त्यांनी सांगितल्यामुळे उपस्थितांना एक वेगळाच आत्मिक अनुभव लाभला. त्यांच्या शांत, सुस्पष्ट आणि प्रभावी वाणीमुळे संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. याप्रसंगी उपस्थित भिक्खू संघाला अट्टपरिखार दान देण्यात आले. यातून दान, शील आणि प्रज्ञा या त्रिसूत्रीचा संदेश अधोरेखित झाला. या धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचे आयोजन मेत्ता ग्लोबल फाउंडेशन, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती आणि बुद्ध प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.