दक्षिण मुंबईत महायुतीची बाजी
विष्णू सोनवणे - नितीन बिनेकर
मुंबई, ता. १७ ः दक्षिण मुंबईतील निवडणूक गाजली ती राजकीय गदारोळामुळे. मात्र राजकीय गदारोळातही भाजपाने बाजी मारली. शिवसेनेचा बालेकिल्ला भेदला. उल्लेखनीय बाब म्हणजे दक्षिण मुंबईत मनसेने मारलेली मुसंडी लक्षवेधी ठरली. भायखळ्यातील अखिल भारतीय सेनेचा गड गडगडला; मात्र गिरगाव, मलबार हिल भागात भाजपाने मजबूत पाय रोवल्याचे दिसून आले.
काँग्रेसचे नेते माजी खासदार मुरली देवरा यांचे १९८४ साली वर्चस्व होते. त्यानंतर बरीच वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले. त्यांच्या निधनांनतर त्यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. दक्षिण मुंबई ही शिवसेनेचा गड बनण्याची प्रक्रिया १९६०च्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून सुरू झाली, जिथे मराठी तरुणांना एकत्र आणून या भागातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये शिवसेनेचा प्रभाव वाढला. १९६९-७०मध्ये वामनराव महाडिक यांच्यासारख्या नेत्यांनी परळमधून निवडून येत शिवसेनेचा पाया मजबूत केला. आतापर्यंत दक्षिण मुंबईत शिवसेनेचा प्रभाव कायम राहिला, मात्र पालिका निवडणुकीमुळे शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का लागल्याचे दिसून येत आहे.
दक्षिण मुंबईत भाजपा-शिवसेना महायुती आणि शिवसेना (ठाकरे), मनसे यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत शिवसेनेकडे असलेला दक्षिण मुंबईचा गड महायुतीला ताब्यात घेण्यात यश आले आहे. येथील मतदारसंघ हायप्रोफाइल म्हणून ओखळले जातात. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामुळे दक्षिण मुंबई चर्चेत आला. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी केलेला हस्तक्षेप यामुळे ते वादाच्या भाेवऱ्यात सापडले. तसेच एकाच कुटुंबातील तिघांना उमेदवारी दिल्याने त्यांचे कुटुंब चर्चेत आले.
प्रभाग २२६मध्ये नार्वेकर यांचे बंधू आणि माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर ११,०५८ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा पराभव केला. या मतदारसंघातील मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांचा अर्ज बाद झाला होता. त्यामुळे पवार या एकमेव उमेदवार नार्वेकर यांच्या प्रतिस्पर्धी राहिल्या होत्या. येथे नोटाला मिळालेली १,४०४ मतेही लक्षवेधी ठरली आहेत. प्रभाग क्रमांक २२५ मधून मकरद नार्वेकर यांच्या पत्नी हर्षिता नार्वेकर, प्रभाग क्र. २२७ मधून नार्वेकर बंधूंची चुलत बहीण भाजपाच्या गौरी शिवकर नार्वेकर विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या रेहाना शेख यांचा पराभव केला. शेख यांना २,१४० मते मिळाली. कुलाब्यात भाजपाचे चांगले पाय रोवले आहेत.
शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांचा प्रभाग क्रमांक १०९मध्ये विजय झाला आहे. प्रभाग क्रमांक २०३मध्ये श्रद्धा पेडणेकर (ठाकरे) पक्षाने मतदारसंघ राखला आहे. गणेश गल्ली प्रभाग क्रमांक २०४ शिवसेना ठाकरे पक्षाचे किरण तावडे विजय झाले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या अनिल कोकीळ यांचा पराभव केला आहे. शिवसेना ठाकरे गटाने काही जागा जिंकल्या असल्या तरी बहुतांश जागा गमावल्या आहेत. दक्षिण मुंबईत जवळजवळ ११ जागा भाजपाने जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने आपल्या पारंपरिक जागा राखल्या आहेत. शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का बसल्याचे दिसून येते.
भायखळ्यात अखिल भारतीय सेनेला या निवडणुकीत यश आलेले नाही. प्रभाग क्रमांक २१६मध्ये काँग्रेसच्या राजेश्री भाटणकर या ११,०४८ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाच्या गौरी नरवणकर यांचा पराभव केला. नगरवणकर यांना ७,५३२ मते मिळाली. प्रभाग क्र. २०५ मनसेच्या सुप्रिया दळवी या १६ हजार १८८ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या वर्षा शिंदे यांचा पराभव केला. शिंदे यांना ८,२५२ मते मिळाली आहेत.
दक्षिण मुंबईतील मुसंडी हे मनसेचे उल्लेखनीय यश आहे. मलबार हिल, गिरगाव या भागात भाजपची पकड कायम आहे. या भागातील शिवसेनेच्या वर्चस्वाला महायुतीने धक्का दिला आहे. या भागात शिवसेना ठाकरे पक्षाला पुन्हा मशागत करावी लागेल.
ठळक वैशिष्ट्ये
- दक्षिण मुंबईत मनसेची मुसंडी
- गिरगाव, मलबार हिल या भागात भाजपने रोवले पाय
- वरळी आणि शिवडी शिवसेना ठाकरे पक्षाने राखले
- महायुतीचा शिवसेनेला धक्का
- भाजपाने ११ जागा मिळविल्या
प्रभाग - १९० - शीतल गंभीर (भाजपा) - ११,४६८
प्रभाग - १९१ - विशाखा राऊत (शिवसेना ठाकरे पक्ष) - १३,२३६
प्रभाग - १९२ - यशवंत किल्लेदार (मनसे) - १४,२५३
प्रभाग - १९३ - हेमांगी वरळीकर (शिवसेना ठाकरे पक्ष) - १२,७६८
प्रभाग - १९९ - किशोरी पेडणेकर (शिवसेना ठाकरे पक्ष) - १२,७८६
प्रभाग - २०९ - यामिनी जाधव (शिवसेना शिंदे पक्ष) - ७,९७४
प्रभाग - २१४ - अजय पाटील (भाजपा) - १३,८४७
प्रभाग - २२१ - आकाश पुरोहित (भाजपा) - ६,९७८
प्रभाग - २२६ - मकरंद नार्वेकर (भाजपा) - १८,०५८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.