वृद्धाची चार कोटींची सायबर लूट
अटक करण्याची भीती दाखवत फसवणूक
नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) ः खारघर येथील एका नामवंत शैक्षणिक संस्थेतील ८० वर्षीय निवृत्त डायरेक्टरला अटक करण्याची भीती दाखवत चार कोटी ३८ लाखांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी अनोळखी सायबर टोळीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणूक झालेले वृद्ध खारघर सेक्टर १२ मध्ये वास्तव्यास असून ते राजस्थान, जयपूर येथील एका नामांकित इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमधून डायरेक्टर पदावरून निवृत्त झाले आहेत. १८ नोव्हेंबर २०२५ला ‘सायबर डेटा प्रोटेक्शन ऑफ इंडिया’मधील अधिकारी असल्याचे सांगत एका सायबर गुन्हेगाराने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. तसेच त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून बनावट सिम कार्ड घेतले असून त्यावरून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याचे व त्याबाबत त्यांच्यावर नाशिक येथे गुन्हा दाखल झाल्याची सांगून त्यांना घाबरवले.
यानंतर स्वतःला नाशिक पोलिस, क्राइम ब्रँच, एनआयए अधिकारी असल्याचे भासवत वेगवेगळ्या गुन्हेगारांनी या डायरेक्टरला संपर्क साधून त्यांना अटकेची भीती घातली. तसेच एका खात्यात सर्व पैसे जमा करण्यास सांगितले. केस निकाली निघाल्यावर संपूर्ण रक्कम परत मिळेल व नुकसानभरपाई दिली जाईल, असे आमिष दाखवण्यात आले. घाबरलेल्या आणि बनावट कागदपत्रांवर विश्वास ठेवलेल्या या निवृत्त डायरेक्टरने नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांवर तब्बल चार कोटी ३८ लाख रुपये ट्रान्स्फर केले.
या सायबर टोळीने इतर नागरिकांकडून फसवणूक करून मिळवलेली एक कोटी दोन लाख रुपयांची रक्कम २४ व २५ नोव्हेंबरला या वृद्धाच्या खात्यात जमा करून ती पुढे इतर खात्यांत ट्रान्स्फर करायला लावून त्याचा वापर केला. या संशयास्पद व्यवहारांमुळे नागपूर सायबर पोलिसांनी डिसेंबरमध्ये या डायरेक्टरचे बँक खाते फ्रीज केले. बँकेकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नागपूर सायबर पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा हा संपूर्ण प्रकार सायबर फसवणूक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शनिवारी (ता. १०) त्यांनी एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल केली. नंतर त्यांनी नवी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.