भिवंडी, ता. १९ (वार्ताहर) : भिवंडी महापालिका राजकारणात गेली २५ ते ३० वर्षे प्रस्थापित असलेले आणि पालिकेच्या सत्तासारीपाटावर ज्यांच्या शब्दाला विशेष वजन आहे, अशा ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा आपले गड शाबूत राखण्यात यश मिळवले आहे. माजी महापौर जावेद दळवी, ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी, बाळाराम चौधरी, मनोज काटेकर, नारायण चौधरी, नीलेश चौधरी, यशवंत टावरे आणि प्रकाश टावरे यांनी या निवडणुकीत विजय मिळवत आपली राजकीय पकड कायम ठेवली आहे.
माजी महापौर जावेद दळवी यांची ही सलग आठवी निवडणूक ठरली आहे. बंदर मोहल्ला, सौदागर मोहल्ला, बाजारपेठ, ब्राह्मण आळी या परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांमध्ये असलेल्या मजबूत जनसंपर्काच्या बळावर त्यांनी भिवंडी विकास आघाडीच्या माध्यमातून विजय मिळवला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण उपस्थितीमुळे आणि स्थानिक प्रश्नांवरील पकडीमुळे त्यांनी आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला आहे. ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांनी पद्मशाली समाजाचे वर्चस्व असलेल्या पद्मानगर परिसरात १९९५ पासून सुरू केलेला राजकीय प्रवास अखंडित राखत सहावा विजय मिळवला आहे. त्यांनी यावेळी डबल हॅट्ट्रिक साकारली आहे.
पालिका निवडणुकांमध्ये अनेकदा राजकीय पक्षांपेक्षा वैयक्तिक नातेसंबंध, हितचिंतक आणि उमेदवाराची प्रतिमा अधिक निर्णायक ठरत असल्याचे याही निवडणुकीत स्पष्ट झाले. भिवंडी महापालिका निवडणुकीत चार उमेदवारांनी शंभरहून कमी मतांनी निसटता विजय मिळवला आहे. प्रभाग ६ अ मध्ये वैभव भोईर (भाजप) यांनी ६,२५७ मते मिळवत भिवंडी विकास आघाडीचे परवेज मोमीन यांचा ९८ मतांनी पराभव केला. तर प्रभाग ६ब मध्ये रिशिका राका (भिवंडी विकास आघाडी) यांनी ६,१६१ मते मिळवत भाजपच्या दक्षाबेन पटेल यांचा अवघ्या २७ मतांनी पराभव केला. प्रभाग ७ क मध्ये रेश्मा अन्सारी (काँग्रेस) यांनी ६,८३१ मते मिळवत समाजवादी पक्षाच्या दीपाली भाई यांचा ७४ मतांनी पराभव केला. तर प्रभाग २२ क मध्ये अपक्ष उमेदवार नितेश नामदेव ऐनकर यांनी ६०७५ मते मिळवत भाजपचे श्याम अग्रवाल यांचा केवळ २१ मतांनी पराभव केला. या प्रभागात फेरमतमोजणीच्या मागणीवरून मतमोजणी केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हॅट्ट्रिक विजय
ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी आणि मनोज काटेकर यांनी टेमघर-कामतघर परिसरात आपला प्रभाव कायम राखत डबल हॅट्ट्रिक विजय साजरा केला आहे. भाजपचे नारायण टावरे, नीलेश चौधरी आणि प्रकाश टावरे यांनी पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीपासून अनुक्रमे ताडाळी आणि नारपोली परिसरात दबदबा राखत सहाव्यांदा विजय मिळवला आहे. यशवंत टावरे यांनीही सलग तिसरा विजय नोंदवला आहे.
पाच हजारांहून अधिक मते
या निवडणुकीत पाच हजारांहून अधिक मतांनी भरघोस विजय मिळवण्याचा मान दोन उमेदवारांनी पटकावला आहे. प्रभाग २३ मधील भाजपचे नारायण चौधरी यांनी अपक्ष उमेदवार रविकांत पाटील यांचा तब्बल ७,०३८ मतांनी पराभव केला, तर प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचे मोमिन तारीक अब्दुल बारी यांनी शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती व माजी आमदार रूपेश म्हात्रे यांचे बंधू संजय म्हात्रे यांचा ५,२३१ मतांनी पराभव केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.