मुंबई

कोण बनणार ठाणेदार

CD

कोण बनणार ठाणेदार?
महापौर पदासाठी शिंदे गटात चुरस
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : गणेश जयंतीच्या मुहूर्तावर महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघणार आहे. या चिठ्ठीत महापौर बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक इच्छुकांचे भवितव्य दडले असले, तरी महापौर म्हणून ठाणेदार बनण्याची संधी आपल्याला मिळावी, यासाठी शिवसेना शिंदे गटात शर्यत लागणार आहे. या पदासाठी अनेक दावेदार असून, यामध्ये जुनेजाणते मावळे आणि रणरागिणी आहेत. तर सत्तेपर्यंत पोहोचवण्यास मदत करणारे ‘घराणे’ही आहे. मात्र हा बहुमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाला देणार, हे पाहावे लागणार आहे.

ठाणे महापालिकेवर शिवसेना शिंदे गटाची एकहाती सत्ता पुन्हा आली आहे. भाजप महायुतीत असून त्यांनी दोन वर्षांसाठी महापौर पदाची मागणी केली असली, तरी ती इच्छा पूर्ण होईल असे चित्र नाही. त्यामुळे महापौर शिवसेना शिंदे गटाचाच होणार, अशी स्थिती आतातरी कायम आहे. अशामध्ये ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून महापौरपदी कोण बसणार याची चर्चा रंगू लागली आहे. यासाठी जबरदस्त फिल्डिंग लावली जात आहे. दरम्यान, हा निर्णय २२ जानेवारीला महापौर पदाच्या सोडतीवर अवलंबून आहे. त्यामुळे महिला आरक्षण आले तर काय आणि त्यातही ते कोणत्या जाती, जमातीसाठी आरक्षित होते का, याकडेही लक्ष लागले आहे. पण जर हे पद सर्वसाधारण गटाकडे गेले तर इच्छुकांची गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

राम रेपाळे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मावळे म्हणून राम रेपाळे यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर अत्यंत दुर्धर आजारातून बाहेर पडत त्यांनी शिंदे यांना भक्कम साथ दिली होती. मुंबईमधील ठाकरे सेनेच्या सर्वाधिक माजी नगरसेवकांना शिंदे सेनेत आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आपली भूमिका पडद्याआडून चोख बजावली होती. आताच्या पालिका निवडणुकीतही स्वत:सह सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आणण्यात त्यांची भूमिका मोठी होती. शिवसेना सचिव पद त्यांच्याकडे आहे. महापौर पदासाठीही ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

रमाकांत मढवी
उपमुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील हा आणखी एक मावळा आहे. दिव्यातून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत त्यांनी त्यांची जबाबदारी चोख बजावली आहे. यापूर्वी त्यांनी उपमहापौर पद भूषवले होते. दिव्यात शिवसेना भक्कम करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महापौर किंवा स्थायी समितीवर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुखदा मोरे
माजी महापौर आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या पत्नी सुखदा मोरे यांचे नावही चर्चेत आहे. महिला आरक्षण पडल्यास त्यांना संधी मिळावी, अशी मागणी जोर धरू शकते. यंदाची ही त्यांची शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे महापौर म्हणून त्यांचा सन्मान व्हावा, अशी इच्छा असू शकते.

मीनाक्षी शिंदे
माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे नावही महापौर पदाच्या शर्यतीत आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी त्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. त्यांची महापौर पदाची कारकीर्दही गाजली होती. स्पष्ट बोलणाऱ्या आणि धाडसी अशी त्यांची ओळख आहे. पण त्यांना पक्षांतर्गत किती साथ मिळते, हे बघावे लागणार आहे.

भोईर कुटुंब
भाईर कुटुंबाचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. देवराम भोईर हे ज्येष्ठ असून संजय भोईर यांनाही महापौर पदाची अपेक्षा आहे. महापौर किंवा स्थायी समिती या दोन पदांवर वर्णी लागावी यासाठी ते आग्रही असल्याची चर्चा आहे. जर महापौर पद महिलेसाठी आरक्षित झाले तर आपल्याच कुटुंबात ते यावे यासाठीही ते प्रयत्न करतील, अशी चर्चा आहे.

फाटक, जगदाळे आणि बरेच
महापौर पदाच्या शर्यतीमध्ये जयश्री फाटक यांचे नावही आहे. याशिवाय हणमंत जगदाळे, मनोज शिंदे यांच्या नावांचे पतंगही उडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दोन गटांत स्पर्धा
शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. यंदा शिंदेंचे कट्टर समर्थक असलेला गट जास्त सक्रिय झालेला दिसत आहे. आता पडद्यामागे राहून नव्हे तर थेट मैदानात उतरून काम करण्यासाठी या वेळी निष्ठावंतांना संधी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: १८ षटकार अन् २९ चौकार... दक्षिण आफ्रिकेच्या यंगिस्तानचा मोठा पराक्रम; स्पर्धेत गाठला नवा उच्चांक

Seized Vehicles: पोलीस ठाणे, पोलीस यार्ड आणि रस्त्यांवरील जप्त वाहनांचा ढिगारा हटवा; राज्य सरकारचा मोठा आदेश, डेडलाईन काय?

बॉलिवूडने नाकारलं, बिझनेसने तारलं! विवेक ओबेरॉय कसा बनला कोट्यवधींचा मालक? नेमके कुठे गुंतवले पैसे? स्वतः सांगितला प्लॅन

BMC Election: महापालिका निवडणुकीत कोणत्या प्रभागात नोटाला जास्त मतं? आकडेवारी समोर

TMC Election: ठाणे महापालिकेत ‘ती’चा आवाज! ६९ रणरागिणींनी लुटले विजयाचे वाण; शिवसेनेच्या सर्वाधिक ४० नगरसेविका

SCROLL FOR NEXT