पराभूतांकडून जनसेवेची सकारात्मक साद;
समाजकारण कायम ठेवण्याचा निर्धार
पनवेल, ता. २० (बातमीदार) : निवडणुकीचा निकाल जाहीर झाला की, एकीकडे विजयाचा जल्लोष, तर दुसरीकडे पराभवाची शांतता दिसून येते. अनेकदा पराभव स्वीकारल्यानंतर उमेदवार निराश होऊन काही काळ राजकारण व समाजकारणापासून दूर राहतात. मात्र, पनवेल शहर व परिसरातील काही पराभूत उमेदवारांनी याला अपवाद ठरत वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. निवडणुकीतील पराभवाला सकारात्मकपणे स्वीकारत त्यांनी समाजमाध्यमांद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटीगाठींमधून जनतेचे आभार मानले असून, पद असो वा नसो, जनसेवा अखंड सुरूच राहील, असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याची खंत असली तरी मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल पराभूत उमेदवारांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. जनतेने दिलेला पाठिंबा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. पराभवाने खचून न जाता अधिक जोमाने समाजकार्यात उतरणार, असा संदेश त्यांनी समाजमाध्यमांवरून दिला आहे. या भूमिकेमुळे त्यांच्या संपर्क कार्यालयांमध्ये तसेच निवासस्थानी कार्यकर्ते, मित्रमंडळी आणि नागरिकांची ये-जा सुरू असल्याचे चित्र आहे. कार्यकर्ते उमेदवारांचे मनोबल वाढवत असून, पुढील काळात अधिक ताकदीने काम करण्याचा विश्वास देत आहेत. विशेष म्हणजे, काही पराभूत उमेदवारांनी निकालानंतरही नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, स्थानिक प्रश्नांवर पाठपुरावा करणे आदी सामाजिक उपक्रम सुरू ठेवले आहेत.
.............
समाजकार्याची नवी सुरुवात
रोडपाली परिसरात सुदाम पाटील यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी निराश न होता दुसऱ्याच दिवशी सकाळी संपर्क कार्यालयात हजेरी लावत समाजकार्याला पुन्हा सुरुवात केली. नावडे प्रभाग क्रमांक दोनमधील भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. तरीही त्यांनी निराश न होता पनवेल महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर कार्यालयांमध्ये विजयाचा आनंद साजरा केला. महेश पाटील यांनी मतदारांचे आभार मानत पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कळंबोली परिसरात एका पॅनेलमधील चौघांचा पराभव झाला. मात्र पराजयाने न खचता सतीश पाटील यांनी प्रभागातील समाजकार्याला पुन्हा सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.