माझा प्रभाग माझी जबाबदारी प्रभाग क्रमांक आठ मुबलक पाणी,
नवी मलनिस्सारण व्यवस्था आणि हॉस्पिटल :
नगरसेवक रामदास शेवाळेंचे प्राधान्य
वसंत जाधव /सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २० (बातमीदार) : कळंबोली वसाहतीतील प्रभाग क्रमांक आठ हा सिडकोकालीन रचनेमुळे अनेक वर्षे पायाभूत सुविधांच्या समस्यांना सामोरा जात आहे. जीर्ण इमारती, अपुरी मलनिस्सारण व्यवस्था, पाणीटंचाई आणि आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगरसेवक रामदास शेवाळे यांनी “माझा प्रभाग, माझे व्हिजन” ही संकल्पना मांडत प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रभाग आठमध्ये अनेक भागांत कमी दाबाने पाणी येणे, अनियमित पुरवठा आणि गढूळ पाण्याच्या तक्रारी सातत्याने येतात. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नवीन जलवाहिन्या, जलसाठवण क्षमता वाढवणे आणि वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे मांडणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. एकही घर पाण्याविना राहणार नाही, यासाठी मी आग्रही भूमिका घेणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभागातील बहुतांश मलनिस्सारण वाहिन्या ३० वर्षांपूर्वीच्या आहेत. गळती लागलेल्या या वाहिन्यांमुळे सांडपाणी रस्त्यावर येणे, दुर्गंधी, डासांचे प्रमाण वाढणे आणि पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी मिसळणे, अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
शेवाळे म्हणाले, सध्याची व्यवस्था पूर्णपणे कालबाह्य झाली आहे. टप्प्याटप्प्याने सर्व वाहिन्या बदलून आधुनिक ड्रेनेज यंत्रणा उभारणे हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी विशेष निधी मिळविण्यासाठी महापालिका व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही ते सांगतात.
मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल!
पनवेल महानगरपालिकेचे प्रस्तावित मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल प्रभाग आठमध्ये उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे कळंबोली, रोडपाली, तळोजा वसाहतीतील हजारो नागरिकांना तातडीच्या व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयाचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार. सामान्य नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागू नये, हे माझे ध्येय आहे, असे शेवाळे यांनी सांगितले.
के. एल. टाईप घरांचा पुनर्विकास
प्रभागात सिडकोची के. एल. टाईप घरे मोठ्या प्रमाणात आहेत. या इमारतींचे आयुर्मान संपत आल्याने रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुनर्विकासाचा विषय प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष प्रस्ताव सादर केला जाणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने राज्य सरकारचे लक्ष वेधून रहिवाशांना हक्काची, सुरक्षित घरे मिळवून देण्याचा निर्धार नगरसेवक रामदास शेवाळे यांनी व्यक्त केला.
शिक्षण, उद्याने व नागरी सुविधा!
कळंबोलीत महापालिकेची अद्ययावत शाळा उभारण्यासाठी प्रयत्न
प्रभागातील उद्यानांची दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती
सार्वजनिक स्वच्छतागृहांना नियमित पाणीपुरवठा
अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पदपथ सुधारणा
कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा
या सर्व कामांसाठी नागरिकांचा सहभाग घेऊन कृती आराखडा तयार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फेरीवाल्यांसाठी शिस्तबद्ध पुनर्वसन!
कळंबोलीत फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची कोंडी आणि अस्वच्छता वाढत आहे. मात्र, उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची भूमिका शेवाळे यांनी मांडली. कारवाईपेक्षा नियोजन महत्त्वाचे आहे. अधिकृत हॉकर्स झोन तयार करून सर्वांना न्याय देणार, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.