लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा ः जिल्हाधिकारी
राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान
अलिबाग, ता. २८ (वार्ताहर) : लोकशाही बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असून, मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. नवमतदारांनी अन्य युवकांना तसेच दिव्यांग व्यक्तींना मतदार नोंदणी आणि मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात १६व्या राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त रविवारी (ता. २५) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, जेएसएम कॉलेजच्या प्राचार्य सोनाली पाटील, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार, युथ आयकॉन तपस्वी गोंधळी आदी उपस्थित होते. लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देणाऱ्या पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी म्हणाले, मतदार यादी हा मतदान प्रक्रियेचा आत्मा आहे. मतदान प्रक्रिया ही लोकशाहीचा आत्मा आहे. नवमतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, त्यांची मतदार म्हणून नोंदणी व्हावी, हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील उद्देश आहे. मतदार यादी सर्वसमावेशक व्हावी, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. महिला, दिव्यांग, आदिवासी, कामगार आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. युवकांची नोंदणी करून त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे. ज्या नवमतदार यांनी मताधिकार बजावला आहे, त्यांनी ही जनजागृती करावी. तसेच मतदार नोंदणीसाठी युवक व युवतींनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी केले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांनी मतदारदिन कार्यक्रमाची माहिती दिली. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी प्रवीण पवार यांच्यासह विविध कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते गौरविण्यात करण्यात आला. भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाल्याने २०११पासून मतदार जागृतीसाठी हा दिवस साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीलदार विक्रम पाटील यांनी मानले.