स्त्रीशक्तीचा जागर
महाराष्ट्रातील रणरागिनींच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यक्रम
खारघर, ता. २८ (बातमीदार) : महाराष्ट्रातील समाजसुधारणेसाठी झटलेल्या रणरागिनींच्या जयंतीचे औचित्य साधत युवा संस्था आणि नवयुवा फेडरेशन यांच्या वतीने स्त्रीमुक्ती महिना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ३ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत स्त्रीशक्तीचा जागर घालण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (३ जानेवारी), क्रांतिज्योती मुक्ता साळवे (५ जानेवारी), फातिमा शेख (९ जानेवारी), राजमाता जिजाऊ (१२ जानेवारी), माता रमाई आंबेडकर (७ फेब्रुवारी) यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. यानिमित्त नवी मुंबईतील नवयुवा शहरस्तरीय संघ आणि त्यांच्याशी संलग्न दीडशेहून अधिक बचत गट सहभागी झाले आहेत. सानपाडा सेक्टर १० येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात गांधीनगर, कोपरखैरणे, सानपाडा, तुर्भे दगदखान, रमाबाई आंबेडकर नगर, बेलापूर, एकता नगर, साईनगर आदी भागांतील १५ बचत गटांतील १२० महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात विधवा व एकल महिलांचा आभूषण देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सुकन्या जाधव, शांताताई आणि डॉ. हर्षा गोयल यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. युवा संस्थेचे सुजित निकाळजे यांनी जिजाऊ, सावित्रीबाई, फातिमा शेख, रमाई आणि मुक्ता साळवे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आचल जावळे, मनीषा चव्हाण, कांचन गोरे, अजय गायकवाड, सुधा ठोंबरे, जयसिंग रणदिवे तसेच युवा साथी यांनी विशेष मेहनत घेतली.
फोटो - 781