कर्करुणालयाची ठाणेकरांना प्रतीक्षा
त्रिमंदिराचे मात्र शानदार उद्घटन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : ठाण्यातील कर्करुग्णांची मुंबईपर्यंत होणारी फरपट थांबावी, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालयाची प्रतीक्षा आणखी वर्ष, दीड वर्षे लांबणीवर गेली आहे. बाळकुम येथील या रुग्णालयासह येथील त्रिमंदिराचे एकत्रित भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी झाले; मात्र त्रिमंदिराचे काम पूर्ण करण्यात तत्परता दाखवली असून, त्यामुळे रुग्णालयाचे काम मागे पडल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, ३० जानेवारीला येथील त्रिमंदिरात मूर्तिचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा होणार असून, त्यानंतर तरी कर्करुणालय ठाणेकरांच्या सेवेत लवकर देण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देशात वेगाने वाढत असलेला कर्करोग, त्याच्या उपचारासाठी होणारा खर्च, उपचारांची मर्यादित उपलब्धता, रुग्णांची गैरसोय, मानसिक आणि आर्थिक समस्या, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या निवास व्यवस्थेतील अडचणी यांची स्थिती लक्षात आल्यावर पाच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सुसज्ज कर्करुणालय उभारण्याचा संकल्प केला होता. त्याला २०२१ मध्ये शासकीय मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सत्तातंर झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्याची धुरा हाती येताच त्यांनी कर्करुग्णालयाला गती देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार टाटा मेमोरिअल आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्याने हे काम जीतो ट्रस्टला दिले. ठाण्यातील बाळकुम येथील ग्लोबल कोविड रुग्णालयासह नजीकच्या भूखंडावर धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय उभारण्यात येत आहे.
ठाणे महापालिकेने ३० वर्षांच्या कराराने जीतो ट्रस्टला बाळकुम येथील जमीन उपलब्ध करून दिली आहे. टाटा मेमोरियल रुग्णालय प्रस्तावित कर्करोग रुग्णालयासाठी तांत्रिक सहकार्य करीत आहे. रुग्णालयाच्या बांधकामासोबत, उपचार साधनांचा सुमारे ५०० कोटींचा खर्च जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट करणार आहे. या ट्रस्टने यापूर्वी कोविडचा सामना करण्यासाठी १२०० खाटांचे अत्याधुनिक ग्लोबल रुग्णालय महापालिकेस उभारून दिले होते. त्यामुळे त्यांनाच हे शिवधनुष्य उचलण्याची जबाबदारी दिली आहे. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ३० जुलै २०२३ रोजी या रुग्णालयाचे भूमिपूजन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. या रुग्णालय परिसारतील भूखंडावर त्रिमूर्ती मंदिर उभारण्यासाठी त्याचेही भूमिपूजन याच मुहूर्तावर झाले. गेल्या तीन वर्षांत कर्करुणालयाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे; मात्र मंदिराचे काम पूर्ण झाले आहे.
रुग्णालयाचे काम रखडले
बाळकुम येथील रुस्तमजी गृहसंकुलाचा भूखंड ठाणे महापालिकेला टाऊन सेंटर उभारण्यासाठी दिला होता. या आरक्षित भूखंडावर सुरुवातीला बिझनेस हब उभारण्यासाठी ग्लोबल सेंटर बांधले; मात्र कोविड काळात या सेंटरचे रूपांतरण कोविड रुग्णालयात झाले. हजारो रुग्ण या सेंटरमधून ठणठणीत होऊन बाहेर पडले. पुढे मग याच सेंटरचा आणि येथील साधन सामग्रीचा उपयोग कर्करुग्णालयासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिसरातील सुमारे पाच एकर भूखंडावर सुसज्ज रुग्णालय बांधण्याचे काम हाती घेण्यात आले, पण ग्लोबल सेंटरचे रूपांतरण करण्याचे काम अजून शिल्लक आहे. येथील लाद्या आणि तोडफोड करण्यात येणार आहे. मंदिराच्या कामामुळे हे काम रखडल्याचे समजते. सर्व रुग्णखाटा, वैद्यकीय साहित्य भंगार होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, त्याशेजारी आणखी एक इमारत बांधण्यात येत आहे. आठ मजले उभारले असून, बेसमेंटमध्ये रेडीएशनचे आठ बंकर उभारण्यात येत असल्याची माहिती जितो सेंटरतर्फे देण्यात आली आहे.
काय असेल कॅन्सर रुग्णालयात?
- धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालयात ५०० हून अधिक रुग्ण खाटा, बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी), आंतर रुग्ण सेवा, रेडिएशन, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, एक्स रे, सीटी स्कॅन, एमआरआय, डे केअर सुविधा, पॅथॉलॉजी आदी सुविधा असतील.
- उपचाराच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या निवासासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली ६०० खाटांची धर्मशाळा उभारली जाणार आहे.
- ती अल्पदरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी उपलब्ध राहील. तसेच, मुंबईतील टाटा रुग्णालयाप्रमाणे या कर्करोग रुग्णालयामध्ये किफायतशीर दरात रुग्णसेवा दिली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.