मुंबईच्या पाणीपुरवठ्यात होणार लक्षणीय सुधारणा
भांडुप संकुलात अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प; आयुक्तांची कामाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ ः भांडुप संकुल येथे उभारण्यात येत असलेल्या २,००० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पास महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भेट देऊन कामांची पाहणी केली. हा प्रकल्प वेळेत व वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देत, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईकरांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि सातत्यपूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक गरजा तसेच नागरीकरणामुळे वाढणारी पाण्याची मागणी लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे आयुक्त गगराणी यांनी नमूद केले. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षम, पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यावेळी उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) महेंद्र उबाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबईला पाणीपुरवठा दोन प्रमुख प्रणालींतून केला जातो. त्यापैकी तानसा-वैतरणा प्रणालीद्वारे तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि अपर वैतरणा या जलाशयांमधील पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून गुरुत्वाकर्षणाने भांडुप संकुलात आणले जाते. भांडुप संकुलातील जुन्या व नवीन जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये या पाण्यावर प्रक्रिया करून दररोज सुमारे २,६०० दशलक्ष लिटर पाणी विविध सेवा जलाशयांमार्फत मुंबईकरांपर्यंत पोहोचवले जाते.
भांडुप संकुलातील १,९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा विद्यमान जलशुद्धीकरण प्रकल्प सुमारे ४६ वर्षांपूर्वी उभारण्यात आला असून, तो सध्या संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी २,००० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प मुंबईच्या शहर आणि पश्चिम उपनगरांतील पाणीपुरवठ्याची क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक
भांडुप संकुलातील सुमारे ७.४ हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणारा हा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठ्या विद्यमान प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे. वाढती पाण्याची गरज भागवणे आणि आयुष्य संपलेल्या जुन्या प्रकल्पाची जागा घेणे, हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सध्या प्रकल्पस्थळी माती परीक्षण, खोदकाम, बॅरिकेडिंग, वीजवाहक तारांच्या मनोऱ्यांचे स्थलांतर, वृक्षारोपण आदी कामांना गती देण्यात आली आहे. स्थापत्य कामांसह यांत्रिकी, विद्युत आणि उपकरणीय कामे समांतरपणे सुरू असून, पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.