३०० कोटी रुपये सोडवण्याच्या नावाखाली साडेअकरा कोटींची फसवणूक
भोजपुरी अभिनेत्रीसह तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
घाटकोपर, ता. ३१ (बातमीदार) : ३०० कोटी रुपये सोडवून देण्याचे प्रलोभन दाखवून घाटकोपरमधील एका व्यापाऱ्याची साडेअकरा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा अवस्थी आणि तिचा पती विवेक सिन्हा यांच्याविरोधात पंतनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरनुसार, घाटकोपरच्या गरोडियानगर येथे राहणारे हितेश अजमेरा हे कस्टम क्लिअरिंग एजंट म्हणून कार्यरत आहेत. गोव्यातील जमीन विक्री व्यवहारादरम्यान त्यांची ओळख शांतीलाल पटेल यांच्याशी झाली. पटेल यांनीच अजमेरा यांची ओळख भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा अवस्थी आणि तिचा पती विवेक सिन्हा यांच्याशी करून दिली.
विवेक सिन्हा याने आपण मागील काही वर्षांत सुमारे ३०० कोटी रुपये कमावले असून, ही रक्कम बिहारमधील चंपारण येथील एका गोदामात ठेवलेली आहे, असा दावा केला. मात्र त्या गोदामाचे ११.५० कोटी रुपये भाडे थकीत असल्याने रक्कम बाहेर काढता येत नसल्याचे सांगण्यात आले. मदतीच्या बदल्यात ३०० कोटींपैकी २०० कोटी रुपये काही वर्षांसाठी विनाव्याजी देण्याचे प्रलोभनही दाखवण्यात आले.
सुरुवातीला अजमेरा यांनी हा प्रस्ताव टाळला, मात्र मोठ्या रकमेच्या प्रलोभनामुळे ते तयार झाले. गोदाममालकाशी भेटीत विवेक सिन्हासोबत झालेल्या कराराची प्रत दाखवण्यात आली. कागदपत्रांवर विश्वास ठेवून अजमेरा यांनी तीन हप्त्यांमध्ये एकूण ११.५० कोटी रुपये विवेक सिन्हाच्या बँक खात्यात वर्ग केले. यानंतर अजमेरा व शांतीलाल पटेल बिहारला गेले असता, गोदामाचा ताबा देण्याचे आणि पैसे परत करण्याचे आश्वासन देणारे विवेक सिन्हा आणि त्याचे सहकारी अचानक गायब झाले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजमेरा यांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा अवस्थी आणि तिचा पती विवेक सिन्हा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.