सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात भरधाव आलेल्या सिमेंट बल्करने रस्त्यालगत उभारलेल्या महावितरणच्या विद्युत खांबांना जोरदार धडक दिल्याची घटना २० जानेवारीला घडली. या अपघातामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या शासकीय मालमत्तेचे ८७ हजार ७६१ रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शुक्रवारी (ता. ३०) रात्री कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन हनुमानजी वाके (वय ४०) हिरानंदानी इस्टेट परिसरात वास्तव्यास आहेत. महावितरणच्या ओवळा शाखा क्रमांक २ येथे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या कार्यक्षेत्रात वीजपुरवठा सुरळीत ठेवणे आणि शासकीय मालमत्तेचे संरक्षण करणे ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. २० जानेवारीला सकाळी ११ वाजता ओवळा-कासारवडवली विभागातील २२ केव्ही चेना फिडर अचानक बंद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वाके आणि त्यांचे सहकारी कर्मचारी संतोष धात्रक यांनी घटनास्थळी पाहणी केली. पाहणीदरम्यान चर्च रोड, नागला बंदर परिसरात एम. के. स्टोन क्रशर ते श्रीजी स्टोन क्रशर दरम्यान महावितरणच्या विद्युत खांबांना सिमेंट बल्करने धडक दिल्याचे आढळून आले. या अपघातात महावितरणचा एक १३ मीटर उंचीचा आणि दोन ९ मीटर उंचीचे असे एकूण तीन विद्युत खांब वाकले; तसेच विद्युत तारा तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊन महावितरणच्या मालमत्तेचे अंदाजे ८७ हजार ७६१ रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, संबंधित सिमेंट बल्कर चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहन भरधाव चालविल्याप्रकरणी दीपक सिंग (वय २२) या सिमेंट बल्कर चालकाविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.