शहर विद्रूप करणाऱ्या होर्डिंगबाजांवर गुन्हे दाखल
अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर पालिकेचा वचक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ ः सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग लावून शहर विद्रूप करणाऱ्यांविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर पालिकेचा वचक बसणार आहे.
दादर येथील शिवाजी पार्क परिसरात अनधिकृतपणे लोखंडी संरचना उभारून होर्डिंग लावल्याप्रकरणी संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाने याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून, होर्डिंगसाठी वापरलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे. यापुढे अनधिकृत होर्डिंग लावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद पालिका प्रशासनाने दिली आहे.
सण, सामाजिक अथवा राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकदा रस्त्यांच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात होर्डिंग, बॅनर आणि पोस्टर लावले जातात. यामुळे मुंबईचे विद्रूपीकरण होत असतानाही पालिका प्रशासनाकडून अनेकदा डोळेझाक केली जात असल्याचा आरोप होत होता. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी अनेक वेळा अवैध बॅनर-पोस्टरविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले असतानाही हे प्रकार थांबलेले नाहीत.
सध्या मुंबईच्या विविध भागांत राजकीय तसेच धार्मिक स्वरूपाचे अनेक बॅनर अद्यापही झळकत असून, त्यावर कारवाई न झाल्याची स्थिती आहे. मात्र, आता पालिकेने कठोर पावले उचलण्याचा इशारा दिल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.
क्यूआर कोडचा वापर नाही
शहरात नव्याने लावण्यात आलेल्या अनेक राजकीय बॅनरांवर क्यूआर कोड आढळून येत नाही. पालिकेकडून अधिकृत परवानगी घेऊन लावण्यात येणाऱ्या बॅनरांवर क्यूआर कोड बंधनकारक असून, त्यामध्ये बॅनर लावणाऱ्याचे नाव, जागेची माहिती आणि परवानगीचा कालावधी नमूद असतो. आता क्यूआर कोड सक्तीचा करण्यात आला असून, त्याशिवाय लावण्यात आलेल्या बॅनरांवर कारवाई केली जाणार आहे.