पनवेल पालिकेत अजित पवार यांना श्रद्धांजली
पनवेल, ता. ३१ (बातमीदार) : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महापालिका मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मंगला माळवे, रवीकिरण घोडके, स्वरूप खारगे, नानासाहेब कामठे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परीक्षक नीलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी बोलताना गणेश शेटे यांनी अजित पवार यांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व, स्पष्ट वक्तृत्व, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांबाबतची जाण आणि प्रशासकीय शिस्त यांचा विशेष उल्लेख केला. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात व अर्थसंकल्पीय मांडणीत त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगत त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, शिवसेना कामगार सेनेच्या वतीने वाशी येथील कामगार नाका परिसरात दिवंगत नेते अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त आयोजित शोकसभेला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. या सभेचे आयोजन शिवसेना कामगार सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष प्रदीप वाघमारे, माजी नगरसेवक मनोहर जोशी आणि उपजिल्हा प्रमुख दीपक सिंग यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनोहर जोशी आणि दीपक सिंग यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित कामगारांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांच्या सामाजिक, राजकीय कार्याचा गौरव केला. पक्षभेद विसरून शिवसेनेचे नामदेव भगत, दिलीप घोडेकर, सचिन नाईक, वैभव गायकवाड, रामबाशिष्ट जैसवाल, दर्शन भणगे, अंजना भोईटे तसेच काँग्रेसचे बाळकृष्ण बैले आणि रिपाईचे अभिमान जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.