लाडकी महापौर होणार विराजमान
ठाण्यात भव्य सोहळा, पालिका मुख्यालय सजले; कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरातही उत्साह
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये मंगळवारी (ता. ३) महापौर विराजमान होणार आहेत. विशेष म्हणजे हे पद महिलांसाठी राखीव नसतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीला मान देत महापौर पदाची संधी दिली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये महिलाराज येणार आहे. दरम्यान, उद्याचा महापौर पदग्रहण सोहळा ठाणे पालिका मुख्यालयात थाटात होणार असून, पूर्वसंध्येपर्यंत त्याची जय्यत तयारी सुरू होती.
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी संपली असून, सत्तेत कोण बसणार याचे चित्रही स्पष्ट झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील सहापैकी पाच महापालिकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपची सत्ता आली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून, ठाण्यात स्पष्ट मिळवले आहे. कल्याण- डोंबिवली आणि उल्हासनगरांतही सत्तेची गणिते जुळवली असली तरी आता या तिन्ही महापालिकांमध्ये महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचा महापौर विराजमान होणार आहे.
ठाणे महापालिका महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले होते. यासाठी शिवसेना शिंदे गटाकडे सात उमेदवार असतानाही कोपरी येथून निवडून आलेल्या शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. सर्वसाधारण गटातून त्या निवडून आल्या होत्या. मात्र कायदेशीर बाबी तापसून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपळोलकर यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन त्यांना सव्व वर्षांसाठी ठाण्याचा प्रथम नागरिक होण्याचा बहूमान दिला आहे. महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड आणि भाजपकडून उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांचा असे प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
३ फेब्रुवारीला ते औपचारिकरीत्या आपला पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी ठाणे पालिका मुख्यालयाबाहेर व्यासपीठ बांधले असून, मुख्यालय फुलांनी सजवण्यात आले आहे. मुख्यालय आवार ते दुसऱ्या मजल्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहापर्यंत रेडकार्पेट अंथरण्यात आले आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: हजर राहणार असून, शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच महायुतीचे नगरसेवक हजर असणार आहेत. कल्याण-डोंबिवली महापौरपदी हर्षाली थविल-चौधरी तर उल्हासनगर महापौरपदी अश्विनी निकम विराजमान होणार आहेत. या दोन्ही महापालिकांमध्ये भाजपचा उपमहापौर असणार असून, येथेही दोन्ही पदांची बिनविरोध निवड झाली आहे.
बहिणींना प्राधान्य
गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजना राबवण्यात आली. या योजनेने शिवसेना शिंदे गटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे नाते जोडले गेले आहे. त्यामुळे शिंदे यांनी महापालिकांमध्ये उमेदवारी देण्यापासून ते आता महापौरपदी वर्णी लावेपर्यंत आपल्या लाडक्या बहिणीला प्राधान्य दिले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या तिन्ही महापालिकांमध्ये महिलांसाठी आरक्षण पडलेले नसतानाही त्यांनी जिल्ह्यातील या तिन्ही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये खऱ्या अर्थाने महिलाराज आणले आहे. पालिकांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ ठरली आहे.
प्रशासकीय राजवट संपुष्टात
ठाणे महापालिकेत ६ मार्च २०२२ रोजी प्रशासकीय राजवट लागली होती. गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण पालिकेचा कारभार प्रशासनाच्या हाती होता. या कालावधीमध्ये प्रशासनाने तीन आयुक्त पाहिले. यामध्ये अभिजित बांगर यांची कायकीर्द गाजली. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे हा उपक्रम त्यांनी यशस्वीरीत्या राबवला. रस्त्यांचे जाळे मजबूत झाले. तर आताचे आयुक्त सौरभ राव यांनीही ठाणे पालिकेला आर्थिक शिस्त लावत विकासकामे सुरू ठेवत आहेत. त्यांना आता लोकप्रतिनिधींची साथ मिळणार असल्याने ठाणे पालिकेचा कारभार आता खऱ्या अर्थाने रुळावर येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.