धर्मवीर दिघेंनी उभा केलेला लढा आजही सुरू
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : मलंगगडावर महाआरती
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : माघ पौर्णिमेनिमित्त कल्याणच्या श्री मलंगगडावर उपस्थित राहून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडाशी संबंधित संघर्षावर स्पष्ट भूमिका मांडली. ‘धर्मवीर आनंद दिघेंनी उभा केलेला लढा आजही सुरू असून, या संघर्षात निश्चितच यश मिळेल,’ असा विश्वास त्यांनी शिवसैनिकांसमोर व्यक्त केला. त्यांच्या या विधानामुळे उपस्थित शिवसैनिक आणि हिंदू भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी श्री मलंग मच्छिंद्रनाथांच्या मंदिरात विधिवत महाआरती केली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात पार पडलेल्या या महाआरतीदरम्यान संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या वेळी हिंदू मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण पूर्व विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
महाआरतीनंतर उपस्थितांशी संवाद साधताना शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा उल्लेख केला. हिंदुत्व, श्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध दिघेंनी उभा केलेला संघर्ष आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. मलंगगडाशी संबंधित प्रश्नांवर सरकार ठाम असून, कायदेशीर मार्गाने आणि स्पष्ट भूमिकेतून हा लढा पुढे नेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
--------
कार्यकर्त्यांना अडविल्याने तणाव
‘मलंगगड ही केवळ एक यात्रा नसून हिंदू समाजाच्या श्रद्धेचे आणि अस्मितेचे केंद्र आहे. त्यामुळे या परंपरेला कोणत्याही प्रकारे धक्का लागू दिला जाणार नाही,’ असा इशाराही शिंदे यांनी दिला. यात्रेदरम्यान शांतता, शिस्त आणि संयम राखण्याचे आवाहन करीत त्यांनी पोलिस व प्रशासनाच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे मलंगगडावर मच्छिंद्रनाथांच्या मंदिरात आरतीसाठी जात असताना पोलिसांच्या नियोजनात काहीसा गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले. हिंदू महाआरतीसाठी जाणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविल्याने तणाव निर्माण झाला होता. भाजपची पहिली आरती झाल्यानंतर पोलिसांची तारांबळ उडाल्याचे दृश्य मलंगगड परिसरात पाहायला मिळाले.
photo : MUM26-F26482
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.