वाशी, ता. २ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर सत्ताधारी पक्षासमोर शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित अनेक प्रश्न उभे आहेत. नियोजित शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत पाणीपुरवठा, वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे, रखडलेला विकास आराखडा, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय प्रश्न रखडल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
नवी मुंबई महापालिकेची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपणार होती, पण कोरोनामुळे पालिकेची निवडणूक लांबणीवर पडली व पालिकेवर मार्च २०२० पासून प्रशासकीय राजवट लागू झाली. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी थेट महापालिका प्रशासन, अधिकारी आणि क्षेत्रीय कार्यालयांवर आली. शहराच्या विविध भागांत नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित असूनही त्या सोडविण्यात प्रशासनाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांचे प्रश्न न सुटल्याने नाराजी आहे.
नवी मुंबईतील वाशी, नेरूळ, बेलापूर, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, तुर्भे, दिघा आदी नोड्समध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे आता उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होत आहे. मोरबे धरणावरील वाढता ताण, जुन्या जलवाहिन्यांमधून होणारी गळती आणि अपुरा साठा यामुळे अनेक परिसरात दरवर्षी पाणीटंचाई होते. नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
दुसरीकडे, नवी मुंबई महापालिकेचा सुधारित विकास आराखडा (डीपी) शासन दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आराखड्यातील आरक्षित भूखंड, रस्ते रुंदीकरण, सार्वजनिक उद्याने, शाळा, रुग्णालये व इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. डीपी अंमलबजावणीतील विलंबामुळे अनेक विकासकामे रखडली असून, बांधकाम परवानग्यांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
नवी मुंबईच्या नागरिकांनी विकासाच्या अपेक्षेने सत्ताधाऱ्यांना संधी दिली असली तरी आता दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात सत्ताधाऱ्यांची खरी परीक्षा या प्रश्नांवर घेतली जाणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
कचऱ्याच्या प्रमाणात वाढ
कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेचा मुद्दाही सत्ताधाऱ्यांसाठी कसोटीचा ठरणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढले असून, त्याचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण व विल्हेवाट लावण्याची गरज आहे. पर्यावरण संरक्षण, हरित क्षेत्रांचे जतन आणि प्रदूषण नियंत्रण याकडेही विशेष लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोंडीमुळे मानसिक त्रास
वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. ठाणे-बेलापूर मार्ग, सायन-पनवेल महामार्ग, वाशी नाका आणि औद्योगिक परिसरात सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात कोंडी होते. उड्डाणपूल आणि रस्ते दुरुस्तीची सुरू असलेली कामे यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अनधिकृत बांधकामांवर कारवाईची गरज
शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. दिघा, तुर्भे, घणसोली आणि काही झोपडपट्टीलगतच्या भागांत अनधिकृत इमारती आणि बांधकामे वाढत असून, याचा थेट परिणाम वाहतूक, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि आपत्ती व्यवस्थापनावर होत आहे. यावर ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.