अंबरनाथमध्ये भक्ती-संघटन-संकल्पाचा संगम
दोन दिवसीय श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव उत्साहात
अंबरनाथ ता. ३ (वार्ताहर) ः विश्वकर्मा विकास संस्था यांच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव उत्साहात साजरी करण्यात आली. बहुसंख्य समाजबांधव व महिलांच्या उपस्थितीत हा महोत्सव शनिवारी (ता. ३१) व रविवारी (ता. १) भक्तिमय वातावरणात पार पडला.
या महोत्सवाचे उद्घाटन अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव जगदीश गांगुर्डे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत ठाणे जिल्ह्यात विश्वकर्मा संस्कृती भवन नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. ठाणे जिल्हा आणि परिसरमध्ये कुठेही सकल विश्वकर्मीय समाज बांधवांसाठी (मनू, मय, त्वष्टा, शिल्पी आणि दैवज्ञ) विश्वकर्मा संस्कृती भवन नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर विश्वकर्मा संस्कृती भवन उभारून देण्याची मागणी केली. त्यावर किणीकर यांनी बुधवारी (ता. ४) जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यासाठी समाजबांधवांसोबत जाण्याची ग्वाही दिली. या घोषणेवर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला श्री छत्रपती संभाजीनगर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक ए. पी. शिंदे व होली फेथ इंग्लिश स्कूल या संस्थेचे संस्थापक धर्मराज धोंडीराम जावणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेवक रवी करंजुळे, श्री विश्वकर्मा विकास संस्थेचे संस्थापक सदस्य रामराव धर्मा सुतार, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ मिस्त्री, कार्याध्यक्ष एकनाथ सुतार, उपाध्यक्ष संजय बोरसे, खजिनदार प्रमोद मोरे, सहसचिव सुनिता भालेराव, सर्व कार्यकारिणी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक
पहिल्या दिवशी हभप सीताराम पोफळकर यांचे हरिकीर्तन व हभप चंद्रकांत खैरनार यांचे प्रवचन झाले. त्यानंतर पालखी मिरवणूक टाळ-मृदंग व हरिनामाच्या गजरात काढण्यात आली. महाप्रसादानंतर पहिल्या दिवसाची सांगता झाली, तर दुसऱ्या दिवशी होली फेथ इंग्लिश स्कूल येथे सकल विश्वकर्मीय समाजाचे कौटुंबिक स्नेहसंमेलन झाले. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन, आरती, समाज प्रबोधनपर भाषणे आणि ईशा नेत्रालयातर्फे मोफत नेत्रतपासणी शिबिर पार पडले. या शिबिराला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महिला व पुरुष समाजबांधवांनी मनोगत व्यक्त करत संघटन व एकत्रित जयंती साजरी करण्याचा संकल्प व्यक्त केला. स्नेहभोजन, हळदी-कुंकू व मनोरंजन अशा विविध कार्यक्रमांनी यंदाच्या महोत्सवाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.